फ्रान्सचा बेंजामिन म्हणतो, "सगळं अतिशय रोमांचकारी, वारी माझ्यासाठी केवळ अद्भूत...!"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:14 PM2022-06-24T15:14:16+5:302022-06-24T15:16:12+5:30
फ्रान्समधील बोर्दोतला बेंजामिन कॉरमॅक वारीने भावला...
पुणे : आषाढी वारीचं आकर्षण सातासमुद्रापार आहेच. पण अगदी वारीच्या दिवशी पुण्यात आलेल्या एखाद्याला त्याबद्दल कुतुहल असणं जरा काही औरच. फ्रान्समधील बोर्दोतला बेंजामिन कॉरमॅक त्याच्या एका पुणेकर मैत्रिणीचे वारीचे फोटो पाहून अक्षरश: उडाला. खरंच एवढी लोकं इतक्या लांब पायी चालत जातात? मला हे बघायचंय, असं म्हणून वारी मुक्कामीच्या ठिकाणी आल्यावर हे माझ्यासाठी केवळ आश्चर्यचकीतच नसून अद्भूतही आहे, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या.
पुण्यातील ऐश्वर्या चौधरी गेली तीन वर्षे फ्रान्समधील बोर्दोत फ्रेंचमधून इंग्रजी शिकवतेय. त्यांच्या कॉ़मन फ्रेंडसर्कलमधून तिची तेथेच इंजिनियर म्हणून काम करत असलेल्या बेंजामिनसोबत ओळख झाली. मित्रांची भेट अधूनमधून होत होतीच. पण बेंजामिन भारतात जातोय, हे तिला पंधरा दिवसांआधीच कळलं. त्याला दिल्ली, हृषिकेश व परिसरात फिरायचे होेते. पण त्यासाठी तो मुंबईहून फ्लाईटनं जाणार होता. योगायोगानं ऐश्वर्या पुण्यात होती. तिनं त्याला पुण्यात बोलावलं. लाखो वारकरी पंढरपूरला पायी जातात, असं तिनं त्याला सांगितलं. ऐश्वर्याला भेटता येईल आणि या लोकांनाही पाहता येईल, असं त्यानं ठरवलं.
बेंजामिन बुधवारी पुण्यात आला आणि पालखी सोहळाही पुण्यातच मुक्कामी आला. ऐश्वर्यानं त्याला वारीचे काही फोटो शेअर केले. तो अक्षरश: उडालाच. काय हे, असं विचारत त्यानं मला लगेच येथे जायचं आहे, असं तिला सांगितलं. पण, आता नको उद्या जाऊ, असं तिनं सांगितलं. बेंजामिन, ऐश्वर्या व तिची एक मैत्रिण निवडुंगा विठोबा मंदिराजवळ रेंगाळत होते. बेंजामिनला एवढी गर्दी नवीन नाही. पण, केवळ एकाच धेय्यासाठी इतकी लोकं पायी चालत जातात, हे त्याला जास्त फॅस्सिनेटिंग वाटलं. वारीत एवढ्या लोकांना मोफत जेवण दिलं जातं, त्याला आश्चर्यकारक वाटलं. हे कसं शक्य आहे? का करतात हे, असे प्रश्न त्याला पडले. हिंदू धर्म, त्याचा पाया, भक्ती, श्रद्धा असं सांगितल्यावर त्यानं मंदिरासमोर हात जोडले.
मी सध्या हिंदुस्थानी संगीत जाणून घेतोय. त्यासोबत भारतही जवळून बघतोय. हिंदू धर्माविषयी फार माहिती नाही. पण, प्रचंड औत्सुक्य असलेला धर्म आहे. वारीतील लोकांमध्ये फिरताना हे सगळं अतिशय रोमांचकारी आहे. मी ज्या ठिकाणाहून येतो, तिथं असं काही नाही. माझ्यासाठी हे एक मोठा अनुभव आहे, हे पाहणे माझ्यासाठी खूप मजेदार आहे.
- बेंजामिन कॉरमॅक, बोर्दो, फ्रान्स