अनेक आघात सोसूनही संघ वर्धिष्णू: अनिरुध्द देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 08:13 PM2018-04-08T20:13:49+5:302018-04-08T20:13:49+5:30

भारतीय विचार साधनेतर्फे अशोक इनामदार लिखित ‘अनासक्त कर्मयोगी - पाच सरसंघचालक’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पेरुगेट प्रशालेत करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.संपर्क प्रमुख अनिरुध्द देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.

beside many critics rss is still raising, says aniruddha deshpande | अनेक आघात सोसूनही संघ वर्धिष्णू: अनिरुध्द देशपांडे

अनेक आघात सोसूनही संघ वर्धिष्णू: अनिरुध्द देशपांडे

Next

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आजवर अनेक आघात झाले. अनेक आघात सोसूनही संघ कायम वर्धिष्णू राहिला. राजकीय क्षितिजावर यश दिसू लागल्यावर संघांचे मूल्यांकन व्हायला सुरुवात झाली. मात्र, संघाने कधीच यशाच्या चाव्या राजकारणात शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण, सामाजिक समरसता हेच संघाचे ब्रीद आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.संपर्क प्रमुख अनिरुध्द देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. महात्मा गांधींच्या हत्येशी संघाचा सूतराम संबंध नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
    भारतीय विचार साधनेतर्फे अशोक इनामदार लिखित ‘अनासक्त कर्मयोगी - पाच सरसंघचालक’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पेरुगेट प्रशालेत करण्यात आले. यावेळी लेखक अशोक इनामदार, प्रदीप नाईक, किशोर सशितल आदी मान्यवर उपस्थित होते.
    देशपांडे म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक सातत्याने चर्चेत राहू लागला आहे, अनेकांकडून विविध पध्दतीने संघाचे मूल्यांकन केले जात आहे. भरपूर फळांनी लगडलेल्या झाडालाच लोक दगड मारतात, हे सर्वश्रूत आहे. गांधी-नेहरु युगापासूनच अशा हीन राजकारणाला सुरुवात झाली. राजकीय स्वार्थासाठी समाजात जातीभेद उत्पन्न केला गेला. संघाने भेदभावाला कधीच थारा दिला नाही. संघ म्हणजे पंथ, संप्रदाय किंवा संस्था नाही. संघाने कायमच सामाजिक समरसता जोपासली आहे. संघाबाहेरचा समाजही आपलाच आहे, हे बंधुत्व कायम आहे.’
‘राष्ट्रभक्ती ही नैैमित्तिक नव्हे तर नित्य असते. संघाच्या शाखांमध्ये कायमच समता, सामुहिकता, मातीशी जोडून राहण्याची वृत्ती जोपासली जाते. कोणाशी तुलना करुन संघाला मोठे व्हायचे नाही किंवा कोणाला लहानही ठरवायचे नाही. संघाला संघर्ष अमान्य आहे. सामान्यातील असामान्यत्व संघ उत्पन्न करतो. सरसंघचालकांचा प्रवास हाच संघाचा विकास आहे. ज्या संघटनाचे नेतृत्व भक्कम असते, ते संघटन सर्वसमावेशक ठरते. समाज, धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण हेच उद्दिष्ट रा.स्व.संघाने कायम जोपासले आहे.’
    इनामदार यांच्या वतीने अरविंद ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर सशितल यांनी आभार मानले.

Web Title: beside many critics rss is still raising, says aniruddha deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.