थरारक खेळांसाठी परदेशी जायची गरज नाही, पुणे आहे उत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 04:35 PM2017-11-01T16:35:29+5:302017-11-01T16:40:51+5:30
क्रिकेट, फुटबॉलसारख्या मुख्य खेळांप्रमाणेच आपल्याकडे आता साहसी खेळांनाही मोठी लोकप्रियता आहे.
पुणे : विविध पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात अनेक हौशी पर्यटक साहसी खेळासाठीही येत असतात. यामध्ये तरुण मुलांचा ग्रुप अधिक प्रमाणात असतो. त्यांना सतत काहीतरी साहसी करावसं वाटतं. जर तुम्हालाही येत्या विकेंडमध्ये काहीतरी साहसी करायची इच्छा असेल तर पुण्यातील काही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सविषयी ही माहिती नक्की वाचा.
आर्टिफीशिअल व्हॉल क्लायबिंग
पुण्यात अनेक रॉक क्लायबिंग प्रशिक्षण केंद्र आहेत. ज्यामध्ये नवशिक्या गिर्यारोहकांना उत्तम प्रशिक्षण देतात. जर तुम्हाला चांगल्या मित्रांच्या ग्रुपची साथ असेल तर पुण्यात येऊन आर्टिफीशिअल व्हॉल क्लायबिंग करायला काहीच हरकत नाही. शिवाजीनगर येथील राजे शिवाजी आर्टिफीशिअल व्हॉल क्लायबिंग सेंटर आहे. तेथे जाऊन तुम्ही या खेळाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
पेंट बॉल
पुण्यातील साहसी खेळांमध्ये प्रसिद्ध असलेला एक म्हणजे पेंट बॉल आहे. प्रतिस्पर्ध्याल्या हरवण्यासाठी या खेळात भरपूर थरार करावा लागतो. आयुष्य मनमुरादपणे आणि निर्भिडपणे जगणाऱ्या लोकांसाठी हा खेळ उत्तम असल्याचं म्हटलं जातं. कल्याणी नगर येथे मॅरिप्लेक्स मॉलमध्ये पी.ए.आय.एन.टी. पेंट बॉल झोन आहे. तिकडे तुम्ही केव्हाही जाऊ शकता. अवघ्या १५०० रुपयात तुम्ही हा थरार अनुभवू शकता.
पॅराग्लायडिंग
साहस आणि भिती या दोन्हींचा मेळ घालणारा खेळ म्हणजे पॅराग्लायडिंग. एखाद्या पक्षाप्रमाणे उडण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पॅराग्लायडिंग करायला काहीच हरकत नाही. मात्र यासाठी थोडीशी काळजीही घ्यावी लागते. संपूर्ण तयारीनिशीच हा खेळ खेळला तरच त्यातील मजा घेता येईल. उंचच उंच उडण्याची, डोंगर-पर्वतरांगांना गवसणी घालण्याची संधी या पॅराग्लायडिंगमुळे आपल्याला मिळते. पुण्यात मुख्यत्त्वे ऑक्टोबर ते जून या कालावधीत हा खेळ खेळला जातो. कामशेतमधील इंडस पॅराग्लायडिंग ही संस्था यासाठी फार प्रसिद्ध आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचा खिसा थोडासा रिकामा करावा लागेल एवढं मात्र नक्की.
रॅप्लिंग
पुण्यातल्या पश्चिम घाटात अनेक धबधबे आणि उंचावट्याची ठिकाणं आहेत. अनेक तरुण मंडळी येथे पावसाळ्यात भेटी देतात. त्यामध्ये रॅप्लिंग करण्यासाठी तरुणाई सर्वात पुढे असते. धबधबाच्या उंचवट्यावरून एका दोरखंडाने एखाद्या प्रवाहाप्रमाणे झपझप खाली उतरण्यासाठी फार साहस लागतं. आपल्या शरीरावर विश्वास ठेवून याआधीचा सर्व अनुभव पणाला लावून रॅप्लिंग केली जाते. एवढ्या उंचावट्यावरुन खाली उतरणं किंवा उंचावट्यावर एखाद्या दोरखंडाने वर चढणं हे काही सामान्य व्यक्तिमत्त्वाचं काम नाही. त्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती आणि निर्भिड व्यक्तिमत्त्वच आपल्याकडे हवं. मुख्यत्वे जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या काळात रॅप्लिंग केली जाते.
बंगी जंम्पींग
जगातल्या सगळ्यात रोमांचकारी खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगी जंम्पींगचा आनंद आपण पुण्यातही घेऊ शकतो. अत्यंत साहसी खेळ असल्याने खूप कमी शहरात या खेळाचा आस्वाद घ्यायला मिळतो. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या लोणावळ्यात तुम्हाला बंगी जंम्पींगचा थरार अनुभवायला मिळेल. लोणावळ्यातील डेल्ला अॅडव्हेंचर क्लबमध्ये हा खेळ तुम्हाला खेळता येणार आहे. फक्त १५०० हजार रुपयात तुम्हाला हा थरार अनुभवता येईल.
एटीव्ही राईड्स
बाईक रायडींगचा थरार आपण प्रत्येक शहरात पाहतो. काहीवेळा कमी वर्दळीच्या रस्त्यावर तरुण मंडळीचा ग्रुप बाईक राईडींगची मजा घेताना दिसतात. त्याचप्रमाणे एटीव्ही राईडींगचीही क्रेझ फार आहे. चिखलात लोळायला किंवा चिखलात खेळायला तुम्हाला आवडत असेल तर एटीव्ही रायईडींगची सफर तुम्ही एकादा करायलाच हवी. चिखलातल्या खडबडीत ठिकाणी अशी रायडिंग केल्याने एक वेगळाच आनंद तरुणांना मिळत असतो. सप्टेंबर ते मार्चच्या दरम्यान लोणावळ्यातील डेल्ला अॅडव्हेंचर क्लबमध्ये तुम्ही एटीव्ही राईड करू शकता.
व्हाईट वॉटर राफ्टिंग
रिव्हर रायटिंग किंवा वॉटर राफ्टिंगचा आनंद आपण प्रत्येक समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी अनुभवायला मिळतो. पुण्यात खास व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार अनुभवायला मिळेल. पुण्यापासून हे ठिकाण थोडंसं लांब असल्याने संपूर्ण दिवस यासाठी तुम्हाला काढावा लागेल. कोलाड येथील कुंदालिका नदीवर व्हाईट वॉटर राफ्टिंगचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. मुख्यत्वे जून ते सप्टेंबर दरम्यान व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी जास्त गर्दी असते.
कायाकिंग
जर तुम्हाला व्हाईट वॉटर राफ्टिंग तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर कायाकिंग हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. तीन-चार बोट जोडून एक भलीमोठी बोट तयार केली जाते. त्यावर जवळपास एकवेळी ७ ते ८ पर्यटक बसू शकतात. कोलाडच्या कुंदालिका नदीवरच तुम्हाला कायाकिंगचा आनंद घेता येणार आहे. जून ते फेब्रुवारी या काळात लोक येथे या खेळासाठी जास्त प्रमाणात येतात.