‘बेटी बचाओ’ चळवळ साता समुद्रापार नेणारा अवलिया .. झांबियामध्ये केले रॅलीचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 07:33 PM2019-03-02T19:33:14+5:302019-03-02T19:36:24+5:30
हे आंदोलन आता भारतापूरतेच मर्यादित न राहता बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, आणि अरब राष्ट्रातही पसरले आहे.
मांजरी : बेटी बचाओ चळवळीने भारतात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या सोबतच चळवळीने स्त्री जन्माचा आदर आणि त्यांचे समाजातील स्थान आहे अधोरेखित केले. तसेच स्त्री विषयीची मानसिकता बदलण्यातही या चळवळीचा मोठा वाटा आहे... परंतु या चळवळीने साता समुद्रापार आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. ही चळवळ साता समुद्रापार पोहचविणाऱ्या अवलियांचे नाव आहे डॉ. गणेश राख...
''मुलींना वाचवून सन्मान द्या, तिला जगवा; जगाला वाचवा'', अशा आशयाच्या घोषणा देत लुसाका, झांबिया (आफ्रिका) येथील नागरिकांनी बेटी बचाओ जन आंदोलनाचे स्वागत केले आहे. डॉ. गणेश राख यांनी भारतात सुरू केलेल्या या आंदोलनाने झांबियातील सामाजिक चळवळीही प्रेरित झाल्या असून डॉ. राख यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकतेच रॅलीचे आयोजन करून 'बेटी बचाओ' चे रणशिंग फुंकले आहे.
झांबियासह अफ्रिकेतील अनेक देशात मुलींबाबतची मानसिकता दुय्यम आहे. डॉ. गणेश राख यांनी भारतात सुरू केलेल्या 'बेटी बचाओ' जन आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद आणि यश लक्षात घेऊन तेथील सामाजिक चळवळींनी त्याबाबत काम करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी डॉ. राख व त्यांच्या सहकाऱ्यांना निमंत्रित करून 'बेटी बचाओ' जन आंदोलनाची मशाल तेथे पेटविण्यात आली आहे. या कृतीने संपूर्ण जगाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
आठ वर्षांपूर्वी डॉ. गणेश राख यांनी पुणे येथून 'बेटी बचाओ' जन आंदोलनाची सुरुवात केली आहे. हे आंदोलन आता भारतापूरतेच मर्यादित न राहता बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, आणि अरब राष्ट्रातही पसरले आहे. झांबियाच्या रूपाने या आंदोलनाने आता आफ्रिका खंडातही प्रवेश केला आहे.
सध्या हे जन आंदोलन आंतरराष्ट्रीय व सोशल मीडियामध्ये खूपच चर्चिले जाऊ लागले आहे. त्यामुळेच झांबिया या देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन या आंदोलनाची सुरुवात झांबियामध्ये करण्याचे ठरविले. त्यासाठी आयोजित रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील कार्यकर्यांना निमंत्रित करण्यात आले होते. माँशिबुकेनी कम्युनिटी बेसड ऑर्गनायझेशन यासारख्या संस्थांसह वेटी टेम्बो, कीथ सिएम, माँशिबुकेनी, शशिकांत सूळ, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शिवदीप उंद्रे, शीतलदेवी मोहिते पाटील अशा हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन झांबियामध्ये या आंदोलनाची सुरुवात केली आहे.