लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, जोडप्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:58 AM2017-11-28T04:58:03+5:302017-11-28T04:58:17+5:30
लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे़
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून फसवणूक करणाºया नागपूरच्या जोडप्याला पुणे सायबर क्राइमने अटक केली आहे़
किशोर चुडामन रामटेककर (वय ३४) आणि त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (वय २८, रा़ विद्यानगर, वाठोडी, नागपूर) अशी त्यांची नावे आहेत़ मेट्रोमोनी साइटवरील प्रोफाइलवरून लग्नाची मागणी आल्यावर, त्यामध्ये सुंदर फोटो व चांगल्या नोकरीचे आमिष दाखविले जाते. मोबाईलवर चॅटिंग करून भावनिक गुंतवणूक करून एखादी घटना घडलेली आहे, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले जात होते. रामटेककर याने पत्नीचे काव्या असलकर, पल्लवी असलकर या नावाने मेट्रोमोनी साइटवर नाव नोंदवून ठेवले होते़
सिंहगड रोड येथील ३१ वर्षांचा आयटी इंजिनिअरचा घटस्फोट झाला होता़ त्याने पुनर्विवाहासाठी एका मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते़ त्याला पल्लवी असलकरनने संपर्क साधला़ दोघांचे चॅटिंग चालू झाले होते़ तिने वडिलांना हार्ट अॅटॅक आल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून या तरुणाकडे २ लाख १५ हजार रुपयांची मागणी केली़ त्याप्रमाणे या तरुणाने बँकेत पैसे भरले़ नंतर या तरुणीचा फोन बंद झाला़ झारखंडला जाऊन चौकशी केल्यावर, अशी कोणी तरुणी येथे काम करीत नसल्याचे सांगितले़
रिंकी एका बँकेत कामाला होती़ सध्या काही करीत नाही, तर किशोर रामटेककर बँकेत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे काम करीत होता़ त्यांना कर्ज झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते अशा प्रकारे फसवणूक करीत होते़
सांगवी येथे राहणाºया ३२ वर्षांच्या तरुणाची २ लाख रुपयांची फसवणूक झाली होती़ त्यामधील मुलीचे नाव काव्या असलकर होते़ तिचा मोबाईल नंबर राजस्थानमधील होता़ पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक स्वप्नाली शिंदे, हवालदार अस्लम आत्तार, सरिता वेताळ व त्यांच्या सहकाºयांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल डाटाच्या माहितीचे पृथ:करण करून त्यांचा ठावठिकाणा शोधला.