‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 08:02 PM2018-12-11T20:02:53+5:302018-12-11T20:04:42+5:30

काही दिवस नोकरी व शेती अशी कसरतही केली. नंतर नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले..

Better farming actress who acted in 'Mulshi Pattern' ..! | ‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..!

‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..!

googlenewsNext
ठळक मुद्देसेंद्रिय शेतीेसाठी आग्रही : मानसिक समाधानाबरोबर पैसा व प्रसिध्दी शेतीमुळेच

विकास चाटी

पुणे : वडिलांची नोकरी सौदी अरेबियात असल्याने आई-वडिलांबरोबर ती अनेक तिथे वर्षे राहिली. पुढे ती आयटी इंजिनिअर झाल्यावर पुण्यातील एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली.काही दिवस आयटी क्षेत्रातील ग्लॅमर, पैसे बरे वाटले पण तरीही तिथे समाधान कुठे मिळेनासा असेच झालेले..यातून मनाची घुसमट सुरु झाली. निसर्गाशी जवळीकता वाढवणारी शेती तिला खुणावू लागली. तशी तिच्या आईवडिलांकडे थोडी शेती होती. मात्र त्या दोघांनीही कधी शेती करायचा विचार केला नव्हता. मालविकाने पगारातील पैशांमधून शिरुर येथे दीड एकर शेती विकत घेतली. मात्र, नुसतेच उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा प्रकार तिला करायचा नव्हता तसेच पारंपारिक शेतीही करायची नव्हती. तिच्या वाचनात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आले असल्याने तिने सेंद्रिय शेती करायचा निश्चय केला. आणि शेतीत रमलेली असताना तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली... तिचा अभिनय व नावाची सर्वत्र चर्चा जोर धरु लागली. ती ही मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री मालविका गायकवाड...

काही दिवस नोकरी व शेती अशी कसरतही केली. नंतर नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले. तिला तिच्यासारखेच सेंद्रिय शेती करणारे मित्रही मिळाले. मग काय! पहिल्यापासून रासायनिक खतांना, औषधांना फाटा देत तिने शेणखत, गोमुत्र यांचा शेतीत वापर सुरु केला. सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळवायचेच याचा ध्यासच घेतला. सतत तीन वर्षांपर्यंत अधिकाऱ्यांनी मातीच्या विविध तपासण्या करुन नन्नाचा पाढा लावला. मात्र त्यानंतर तिने पुढील वर्षी सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळविलेच.

.................

 सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर सेंद्रिय शेतमाल बाजारात विकता येत होता. मात्र बाजारसमितीत माल नेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून ‘ सब घोडे बारा टक्के ’ या न्यायाने सेंद्रिय शेतमालास रासायनिक मालाप्रमाणेच भाव मिळू लागला. अखेर अशा पद्धतीने विक्री फायदेशीर नाही हे लक्षात आले. मग तिच्यासह ४४२ सेंद्रिय शेतमाल उत्पादक मित्रांनी मिळून ‘ दी आॅर्गेनिक कार्बन प्रा. लि. ’ या नावाने कंपनी स्थापन केली. ‘हंपी ए-२ ’ या नावाने ब्रॅण्ड बनवून शेतमाल उत्पादन विक्री सुरु केली. सर्व मित्रमंडळी मिळून सुमारे २५० देशी गायींचा सांभाळ ते करतात. त्यांच्या गोमुत्र व शेणाचाच शेतीत वापर होतो. तिच्या शेतावर तिने मेथी, पालक यासारख्या पारंपरिक भाजीपाल्याबरोबरच यलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, लेट्युस आदी एक्झॉटिक भाजीपाला घेण्यावर भर दिला. दैनंदिन विक्री व्हावी यासाठी सेंद्रिय दुध विक्रीला सुरुवात केली. पुण्यात सकाळी लवकर दूध विक्री व्हावी यासाठी भल्या पहाटे उठून मित्रांसह सर्व नियोजन करावे लागत होते. --

शेतीच्या नादिष्टपणामुळेच अभिनेत्री बनण्याचे भाग्य मालविकाला सकाळची जिम करायचीही आवड होती. मात्र दुधविक्रीच्या नियोजनासाठी सकाळचा वेळ जात असल्याने सकाळी नियमित जिमला जाण्याच्या सवयीला तिला मुरड घालावी लागली. पण म्हणतात ना देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच! सकाळीची जिम होत नव्हती म्हणून तिने दुपारची जिम सुरु केली. याचाच तिला ‘स्टार ’चमकल्याप्रमाणे फायदा झाला. दुपारच्या जिमला येणाऱ्या पुण्यातील ‘सुर्वेज्’ या हॉटेलचे मालक माधव सुर्वे यांच्याशी तिची ओळख झाली. सुर्वे हे चित्रपट निर्माते प्रवीण तरडे यांचे मित्र. प्रवीण तरडे हेही त्यावेळी ‘मुळशी पॅटर्न’ साठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. सुर्वे यांनी मालविकाला चित्रपटात काम करणार का अशी विचारणा केली. तिने हो म्हटले खरे पण ही नुसती गंमतच आहे असे तिला वाटले. मात्र काही दिवसांनी माधव सुर्वे यांच्या सोबतीने तिने प्रवीण तरडे यांची भेट घेतली. प्रवीण तरडे यांच्याकडे त्यावेळी नायिकेची भुमिका मिळावी म्हणून पुरुषोत्तम करंडक अशा नाट्य स्पर्धा गाजविलेल्या सुमारे ६००-७०० मुली आॅडिशनसाठी आल्या होत्या. यात आपला काय निभाव लागणार अशी नकारात्मक मानसिकता ठेवूनच मालविकाने आॅडिशन दिली. आॅडिशनमध्ये तिला विशेष अभिनय निपुणता जरी दाखविता आली नाही तरी ती शेती करते, शेतकऱ्यांच्या समस्यांची चांगली जाण असल्याचे जाणवल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तिची नायिका म्हणून निवड केली. तिला स्वत: अभिनय शिकवून चांगल्यापैकी अभिनयही करवून घेतला. चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालून मोठा व्यवसाय मिळविला ; आणि काही दिवसातच तिचे नाव सर्वांच्या तोंडी आले. शेतीने तिला केवळ पैसाच नाही तर मानसिक समाधान व राज्यभर खणखणीत प्रसिद्धीही मिळवून दिली. याचे सगळेच श्रेय ती शेतीला देते.

...............

शेतकरी समस्यांविषयक चित्रपटांना प्राधान्य

मालविका गायकवाड यांचे शेती प्रेम आता वाढणारच असून यापुढेही चित्रपटातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायला आवडेल अशी भुमिका आहे. एवढेच नाही तर सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना तारणार असून सेंद्रिय शेतीमाल खाल्ल्यानेच सामान्य नागरिकांनाही सकस व विषमुक्त पोषण मिळणार आहे असे तिचे मत आहे. त्यामुळे याबाबत कोणी मदतीची हाक दिली तर तिच्या परीने मदत करण्यास तिला आवडेल असेही ती सांगते.

---

Web Title: Better farming actress who acted in 'Mulshi Pattern' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.