विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास चोख बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:53 AM2018-12-28T00:53:07+5:302018-12-28T00:53:27+5:30
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील.
आव्हाळवाडी : कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीसह सर्व सेवांच्या नियोजनाचा आराखडाही प्रशासनाने तयार केला आहे.
१ जानेवारीला कोरेगाव व परिसरात झालेल्या दंगलीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेत सुसज्ज तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार : यावर्षी १० पटीने जास्त पोलीस बंदोबस्त आहे. यात ४२५ अधिकारी, ५००० पोलीस कर्मचारी, १२ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, ५ वरुण तर ५ वज्र वाहने, १२०० होमगार्ड व निमलष्करी जवानांसह मोठा पोलीस बंदोबस्त आहे. गोपनीय माहितीसाठी साध्या वेशात अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे. येथील प्रत्येक हालचालीवर निगराणीसाठी ४० कॅमेरे, १२ ड्रोन कॅमेरे, ३०० सीसीटीव्ही, तसेच १५ इमारती, तसेच ५ ठिकाणी वॉच टॉवरवरून दुर्बिणीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. १५० पाण्याचे टँकर, ३६० फिरती स्वच्छतागृहे, २० अग्निशमन, १५ आरोग्य मदत केंद्रे, २३ रुग्णवाहिका यंत्रणा, १० क्रेन, २०० फायर रेझिस्टंट बलून्स, पी. ए. सिस्टीम अशा सुसज्ज यंत्रणाही सज्ज असणार आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर, लोणीकंद, पेरणे फाटा, वाघोली परिसरात मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध घालण्यात येणार आहेत. मात्र पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्यक साधने असणार आहेत.
अंतर्गत वाहतुकीसाठी १०० बसेस
एक जानेवारीला पुणे-नगर महामार्गावर पेरणे टोलनाका ते शिक्रापूरदरम्यान इतर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ३१ डिसेंबरपासूनच या टप्प्यात १०० पीएमपी बसेसच्या साह्याने विजयस्तंभापर्यंत अंतर्गत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मानवंदनेसाठी येणाºया वाहनांकरिता ११ ठिकाणी पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिकांकडून होणार स्वागत...
दंगलीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने दोन महिन्यांत परिसरातील स्थानिक व्यापारी, तसेच ग्रामस्थांच्या २५० पेक्षा जास्त बैठका घेत सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न केले आहेत. या बैठकांमुळे स्थानिक नागरिकांतही बंधुत्वाची भावना जागृत झाली असून स्थानिक पदाधिकारी, व्यापारी, तसेच नागरिकांकडूनही मानवंदनेसाठी येणाºया बांधवांचे स्वागत पाणी व फुले देऊन केले जाणार आहे.