आयपीएल सामन्यावर कोथरूडमध्ये बेटिंग
By admin | Published: April 26, 2016 01:05 AM2016-04-26T01:05:54+5:302016-04-26T01:05:54+5:30
आयपीएलच्या सामन्यावर मोबाईलवरून बेटिंग घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने रविवारी अटक केली आहे.
पुणे : आयपीएलच्या सामन्यावर मोबाईलवरून बेटिंग घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने रविवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल व रोख रक्कम, असा ४१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कोथरूड येथील एका सदनिकेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात लायन्स या सामन्यावर बेटिंग सुरू होते.
संजय रामआश्रय गुप्ता (वय ३५, रा. शिवांजली हाईट्स, कोथरूड) आणि राम राधेशाम मोर्य (वय ३५, रा. इंद्राशंकर नगरी, कोथरूड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. बेटिंगबाबत दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार त्यांच्या पथकाने कोथरूड येथील शिवांजली हाईट्समधील सदनिकेवर छापा टाकला. या ठिकाणी गुप्ता व मोर्य यांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे विविध कंपन्यांच्या ६ मोबाईलवरून टीव्हीसमोर बसून बेटिंग घेताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, एक टीव्ही, मोबाईल व इतर साहित्य, असा ४१ हजार ४६० रुपयांचा ऐवज जप्त केला. पिंगळे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, असिफ पटेल, प्रदीप शितोळे, शरद कणसे, राहुल घाडगे, प्रमोद गायकवाड, मलिकार्जुन स्वामी, विनायक पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.