सावधान, बुवाबाजी फोफावतेय! राज्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तब्बल ६५० गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:33 PM2021-07-12T22:33:52+5:302021-07-12T22:35:01+5:30
नरबळी, चमत्काराचा दावा करून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणे, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणे आदी विविध घटनांनुसार जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात गुन्हे दाखल आहेत...
नम्रता फडणीस-
पुणे : तुमची पत्नी पांढऱ्या पायाची आहे सांगून करणी करणे, पैशांचा पाऊस पाडून देतो, विशिष्ट अंगारा लावला तर पुत्राची प्राप्ती होईल, गुप्तधन, नरबळी, नग्नपूजा, लैंगिक शोषण अशा बुवाबाजी विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात आत्तापर्यंत 650 गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात ही संख्या जवळपास 80 च्या आसपास आहे. यामध्ये न्यायालयात जवळपास 30 केसेसचा निकाल लागला असून, दोषींना शिक्षा देखील झाली आहे. तरीही, कायद्याबाबत अद्यापही म्हणावे तितके समाजप्रबोधन नसल्यामुळे तक्रार दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने बुवाबाजी, मांत्रिकांकरवी होणारे अघोरी प्रकार, असाध्य रोग बरे करण्यासाठी दिली जाणारे आव्हाने याविरूद्ध आवाज उठवत आहे. समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळ्कर यांच्या खुनानंतर 26 ऑगस्ट 2013 रोजी तत्कालीन सरकारने जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केले. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी अंनिसचे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. भानामती, नरबळी, चमत्काराचा दावा करून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणे, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणे, पुजेला विवस्त्र बसण्यासाठी महिलांना जबरदस्ती करणे आदी विविध घटनांनुसार जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अँनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली.
पुण्यात विश्रांतवाडी येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. कोंढव्यात एकाला सहा लाखांची कबुतरे घ्यायला लावून कबुतरामध्ये माणसाचे सर्व आजार जातील, पत्रिका पाहून रत्न देणे, पिंपरीमध्ये नेहरूननगर मध्ये महिलेला मुलगा होत नाही म्हणून कुटुंबातील मुलींचे लैंगिक शोषण करणे, अशा अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत. या घटनांबाबत अंनिसने पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत अशा घटनांमध्ये तक्रारदारांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाते आणि त्यानंतरही गुन्हयाचा पाठपुरावा केला जातो असेही ते म्हणाले. दरम्यान, येमूल याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत सोमवारी (दि.12) निवेदन देण्यात आले.
----------------------------------------------------------------------------------------------------------
सध्या कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गतच ‘ती’ पांढऱ्या पायाची आहे, असे सांगून तिचा मानसिक छळ केला जातोय. जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम 6 नुसार अशा प्रकारचा आरोप करणे हा गुन्हा आहे. मात्र, पोलिसांकडून जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना वाढत चालल्या आहेत. पण कुणी तक्रार करण्यास फारसे पुढे येत नाही. अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल याच्यावर गुन्हा दाखल केल्याबददल पोलिसांचे कौतुक आहे, पण त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम समाविष्ट केले नाही.- नंदिनी जाधव, कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस पुणे जिल्हा
-----------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल संबंधित महिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची आहे असे सांगून तिला लिंब, करणी असे जादूटोण्याचे प्रकार करायला लावले ही अत्यंत गंभीर बाब आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अध्यात्मिक गुरूचा निषेध करते आणि त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे
- प्रशांत पोतदार, महा. अंनिस बुवाबाजी संघर्ष विभाग.
----------------------------------------------------------------------------------------------------------
राज्यात बुवाबाजीची गाजलेली काही प्रकरणे
* आसवली (ता.खंडाळा.जि सातारा) येथील उदयनाथ महाराजांनी असाध्य रोगावर उपचार करण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केली.महाराष्ट्र अंनिसमुळे महाराजांची भोंदूगिरी समोर आली.
* कुशीरे (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) गुरव बंधूंनी डोळ्यांच्या सर्व उपचारांवर झाडपाल्याचे रामबाण औषध देतो असे सांगून लोकांना फसविले.
* शेषराव महाराज यांनी आपल्यात दारू सोडविण्याची अदभूत शक्ती आहे असे सांगून लाखो लोकांना गंडविले.
* प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची मुलीच्या केलेल्या लैंगिक शोषणाबाबत कारागृहात रवानगी करण्यात आली.
* पुण्यातील रघुनाथ येमूल याने प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी अटक.
-------------------------------------