सावधान! सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; मेलवर विश्वास ठेवला अन् ८० लाख झाले साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:49 AM2023-02-02T09:49:55+5:302023-02-02T09:50:25+5:30
पुण्यातील कंपनीने मूळ कंपनीचा ई-मेल समजून त्याने सांगितलेल्या खात्यात डॉलर्स ट्रान्सफर केल्याने एका फटक्यात कंपनीला ८० लाखांचा फटका बसला...
पुणे : परदेशातील कंपनीबरोबर करार केला आणि महत्त्वाच्या वस्तू मागविण्यासाठी कंपनीकडून ई-मेलदेखील आला. दिलेल्या बँक खात्यावर त्यांनी पैसेही ट्रान्सफर केले. प्रत्यक्षात दोन्ही कंपन्यांमधील व्यवहारात सायबर चोरट्यानेच पैशांवर डल्ला मारला. परदेशी कंपनीसारखाच ई-मेल धारण करून चोरट्याने मूळ कंपनीऐवजी दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. पुण्यातील कंपनीने मूळ कंपनीचा ई-मेल समजून त्याने सांगितलेल्या खात्यात डॉलर्स ट्रान्सफर केल्याने एका फटक्यात कंपनीला ८० लाखांचा फटका बसला.
शहरात एकेकाळी खून, मारामारी, कौटुंबिक हिंसाचार याचे गेल्या वर्षभरात जवळपास दहा हजार गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या तुलनेत सायबर गुन्ह्याच्या दुप्पट १९ हजार २३ तक्रारी आल्यात. त्यात कोट्यवधी रुपयांची लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.
सर्वाधिक लोन ॲप फसवणूक
सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक लोन ॲपद्वारे झालेल्या फसवणुकीचा समावेश आहे. ५ ते १० हजारांचे लोन घेताना सायबर चोरटे त्यांच्या मोबाइलमधील सर्व माहिती स्वत:कडे घेतात. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. त्यांच्या फोटो गॅलरीतील फोटो मॉर्फिंग करून त्याचे अश्लील फोटो तयार करून कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना पाठवून बदनामी करतात.
गोल्डन अवरमध्ये गोठवता येतात पैसे
फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांना कळविल्यास पोलिसांकडून तातडीने हालचाल केली जाते. यासाठी पुण्यात सायबर पोलिसांनी हेल्पलाइन नंबर दिले आहेत. फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्यास पोलिस ज्या बँक, मर्चंट खात्यात हे पैसे गेले, त्यांना तातडीने कळवून ते पैसे गोठविण्यास सांगितले जाते.
सहा कोटी ६० लाख केले परत
सायबर पोलिसांकडे आलेल्या तक्रारीपैकी तब्बल सहा कोटी ६० लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. त्यात अनेकांचे १०० टक्के पैसे परत मिळाले आहेत, तर काही जणांचे ८० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत पैसे मिळाले आहेत.
कोठे कराल तक्रार
सायबर पोलिस ठाण्याच्या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता
०२० - २९७१००९७
७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५
२०२२ मधील तक्रारी
लोन ॲप फ्रॉड - ३४७३
फेसबुक, इन्स्टाग्राम - ३०५८
न्यूड व्हिडीओ फ्रॉड - १४५८
जॉब फ्रॉड - ७९७
फेसबुक, ट्विटर हॅकिंग - ६३०
ऑनलाइन खरेदी - २५५
क्रिप्टो करन्सी - १५४
शेअर मार्केट - १४४