सावधान...!पीएमपीमधून फुकट प्रवास करू नका; भरावा लागणार 'एवढा' दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:29 PM2023-04-19T12:29:11+5:302023-04-19T12:29:20+5:30
पीएमपी बसमधून प्रतिदिन ४५ ते ५० प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळत आहेत
पुणे : पीएमपी बसमधून फुकट्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रतिदिन ४५ ते ५० प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळत असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीएमपीच्या ताफ्यात २ हजार १४२ गाड्या आहेत. त्यातील १,६५० ते १,७०० गाड्या दररोज मार्गावर असतात. त्याद्वारे दररोज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून १० लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेकजण गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पीएमपीने नियुक्त केलेल्या चेकरच्या (तिकीट तपासणीस) पथकाला त्यातील काही सापडतात. दिवसाला अशा फुकट्या प्रवाशांची संख्या साधारण ४५ ते ५० च्या जवळपास आहे, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
विनातिकीट भरावा लागेल ५००चा दंड
पीएमपीतून विनातिकीट प्रवास केल्यास ५०० रुपये दंड करण्यात येत आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाकडून १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांनी ‘पीएमपीएमएल’च्या बसमधून प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे ‘पीएमपीएमएल’चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.