फेसबुक, आॅनलाइन फसवणुकीपासून राहा सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:47+5:302021-06-02T04:09:47+5:30
पुणे : फेसबुकवर मैत्री करून खाते हॅक करणे, आॅनलाइन बक्षिसांचे आमिष दाखवून लुटणे, बक्षिसांचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप क्रमांकावर लिंक ...
पुणे : फेसबुकवर मैत्री करून खाते हॅक करणे, आॅनलाइन बक्षिसांचे आमिष दाखवून लुटणे, बक्षिसांचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप क्रमांकावर लिंक पाठवणे आणि त्याद्वारे फोन हॅक करून बँकेतील रक्कम लंपास करणे अशा अनेक तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, दररोज हजारो रुपयांवर आॅनलाइन दरोडा पडत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांसह पोलीसही हैराण झाले आहेत.
शिवाजीनगर येथील सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात दररोज शेकडो तक्रारी दाखल होत आहेत. त्यात ५०० ते दोन लाखांपर्यंत फसवणूक झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. गावावरून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या एका तक्रारदार तरुणाने सांगितले की, फेसबुकवर अनोळखी तरुणीशी मैत्री केल्यानंतर तिला व्हॉट्सअॅप क्रमांक दिला. त्यानंतर माझ्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. हे फोटो कायमचे काढून टाकण्यासाठी माझ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. घाबरून मी आतापर्यंत १५ हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतरही पैशांसाठी मला सतत त्रास दिला जात होता. त्यामुळे सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
सरकारी नोकरीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, माझ्या पत्नीचे बँक खाते हॅक झाले होते. काही दिवसांपूर्वी तिच्या खात्यावरून परस्पर ४० हजार रुपये वजा झाले. त्यामुळे आम्ही तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. मात्र, त्याचवेळी माझ्या खात्यातून ६० हजार रुपये वजा झाल्याचा संदेश आला आणि मला धक्काच बसला. केवळ १५ दिवसांत आमचे एक लाख रुपये गेले आहेत.
तक्रार करण्यासाठी आलेल्या एका तरुणीने सांगितले की, माझी आॅनलाइन माहिती हॅक करून परस्पर १५ हजार रुपये काढण्यात आले. फेसबुक, व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत नसतानाही हा प्रकार घडला. त्यामुळे मी तातडीने यूपीआय आयडी ब्लॉक करून संभाव्य नुकसान टाळले. पोलिसांनी सांगितले की, फेसबुकवर अनोळखी तरुणीच्या खात्यावरून मित्र विनंती पाठवून ‘न्यूड व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणांनी फेसबुकवर अनोळखी मैत्री टाळावी.
पोलिसांचे आवाहन
फेसबुकवर वैयक्तिक, नातेवाईक, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख ही माहिती देऊ नका. अनोळखी मैत्री विनंती स्वीकारू नका, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तातडीने सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करा, अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संदेश आल्यास ते क्रमांक तातडीने ब्लॉक करा, फेसबुक खाते काही दिवस बंद ठेवा, धमकी देणाऱ्या कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.