कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांनाे सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:02+5:302021-06-28T04:09:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्व शहरात कर्णकर्कश हॉर्न ऐकायला मिळतात. त्याचा प्रचंड त्रासही होतो. अशा हॉर्नचा वापर केल्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्व शहरात कर्णकर्कश हॉर्न ऐकायला मिळतात. त्याचा प्रचंड त्रासही होतो. अशा हॉर्नचा वापर केल्यास दंड केला जाऊ शकतो. शहरात वाजणाऱ्या या हॉर्नच्या मानाने कारवाई मात्र त्यामानाने कमी झाल्याचे दिसून येते. शहरात गेल्या ५ महिन्यांत ३८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर त्या वाहनचालकावर कारवाई केली जाते. मात्र, त्याला मर्यादा येतात. कानाला इजा पोहोचविणारे कर्णकर्कश हॉर्न शहरात बिनदिक्कतपणे वाजतात. मात्र, जेथे ते वाजविले जातात, तेथे नेमके पोलीस नसल्याने अशा हुल्लडबाज वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे पोलीस कारवाई करीत या भीतीपोटी मुख्य चौकातून ते वाहनचालक मुकाटाने जातात. मात्र, पुढे गेल्यावर हॉर्न वाजविला जातो.
------------------------
वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
प्रकार जानेवारी ते मे २०२० जानेवारी ते मे २०२१
केसेस दंड केसेस दंड
नो पार्किंग १७४४२८ ३४८८५६०० १००७५५ २०१५१२००
सिग्नल तोडणे ३३९७६ ६७९५२०० ५०५७४ १०११४८००
हॉर्न वाजणे ३०३ १३९८०० ३८५ १८०२००
-----------------------
फॅन्सी हॉर्नची फॅशन
अलीकडे बुलेट किंवा इतर दुचाकींमधून वेगवेगळे आवाज काढण्याची फॅशन आली आहे. मागून जोरात हॉर्न वाजविला जातो. तेव्हा पुढे जाणाऱ्र्या दुचाकी वाहनचालकाला मागून मोठे वाहन आल्यासारखे वाटते. त्यामुळे तो बाजूला होतो, मात्र, मागून दुचाकीवर हुल्लडबाजी करणारे टोळके जात असल्याचे दिसते. हाॅर्नमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याचा धोका वाढत आहे.
सतत अशा हॉर्नचा कानावर आवाज पडल्याने कानाचेही आजार वाढू शकतात. विशेषत: मुख्य रस्त्याच्याकडेला असलेले दुकानदार, विक्रेते तसेच बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या कानावर सातत्याने असे हॉर्न पडले तर त्यांना काही काळाने बधिरता येऊ शकते. ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे, अस्वस्थता वाटणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यामध्ये अडथळा येणे. असे दुष्परिणाम होऊ शकतो.
------------------
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर...
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार शांतता झोन असलेल्या परिसरात ५० डेसिबल, निवासी झोन असलेल्या परिसरात ५५ डेसिबल, वाणिज्य झोन परिसरात ६५ डेसिबल, तर औद्योगिक झोन परिसरात ७५ डेसिबलपेक्षा कमी ध्वनीपातळी ठेवे आवश्यक आहे. कारवाईत दोषी आढळल्यास वाहनचालकावर ५ वर्षे कैद किंवा १ लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात येणार आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्याच्या कलम ११९/२३० नुसार कारवाई केली जाते.