फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:11+5:302021-05-20T04:11:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्करातील वरिष्ठपदावरून निवृत्त झाल्यानंतर खूप काळाने त्याने एका मित्राला फेसबुकवर संपर्क साधला. मित्र आहे ...

Beware if money is demanded from Facebook | फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्करातील वरिष्ठपदावरून निवृत्त झाल्यानंतर खूप काळाने त्याने एका मित्राला फेसबुकवर संपर्क साधला. मित्र आहे म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. काही दिवसाने त्याच्या मुलाने फेसबुकवर संपर्क साधला. वडील परदेशातून येत असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे. येथे क्रेडिट कार्ड चालत नाही. उपचारासाठी पैसे पाठवावे. भारतात परत आल्यावर पैसे परत करेल, असा मेसेज पाहून त्यांनी मित्राला मदत म्हणून काही लाख रुपये पाठविले. बरेच दिवसानंतर ते एका कार्यक्रमात भेटल्यावर तब्येतीची चौकशी झाली. तेव्हा त्याने आपण कधीच परदेशात गेलो नाही की कोणत्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट नव्हतो, असे त्या मित्राने सांगितले. तेव्हा त्याच्यासारख्याच दिसणा-या बनावट फेसबुकवरून फसवणूक केल्याचे लक्षात आले.

सोशल मीडियाचा वापर करून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यात सर्वाधिक फसवणूक ही सोशल मीडियावर मैत्री करून त्यानंतर परदेशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचे सांगून ते कस्टममध्ये अडकल्याचा बहाणा करून लुबाडणे. त्यानंतर फेसबुकवर मैत्री केल्यानंतर परस्परांना व्हिडीओ कॉलवरून संपर्क करणे, त्यानंतर असभ्य, अश्लील व्हिडीओ, फोटो पाठविण्यास समोरील व्यक्तीकडून सांगितले जाते. प्रेमातून असे फोटो, व्हिडीओ शेअर केले की, त्यानंतर हे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. ही मागणी कधीही थांबत नाही.

परिचित व्यक्तींकडून होतो गैरवापर

मित्र, नातेवाईक म्हणून अनेक तरुणी त्यांच्याबरोबर आपले फोटो, व्हिडीओ शेअर करीत असतात. असेच जवळचे परिचित त्याचा गैरवापर करून ते सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. किंवा ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात.

-------------

अशी घ्या काळजी

* फेसबुकवरून जर कोणी पैशाची मागणी करीत असेल तर प्रत्यक्ष फोन करून अथवा भेट घेऊन अगोदर खात्री करा.

* शक्यतो अपरिचित व्यक्तीला आपला नंबर देऊ नका. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तीचे प्रोफाईल खरे असेलच असे नाही. त्यामुळे विश्वास ठेवू नका.

* गिफ्ट कस्टममध्ये अडकले असे कोणी सांगत असेल तर नक्कीच तो सायबर चोरटा असणार, हे लक्षात घ्या

* कोणालाही अगदी परिचित असलेल्यांनाही आपले न्युड फोटो, व्हिडीओ पाठवू नका.

* जर कोणी धमकावत असेल तर तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. तुमचे नाव गुप्त ठेवून पोलीस संबंधितांवर कारवाई करतील

...............

या वर्षात आतापर्यंत सोशल मीडियाबाबत आलेल्या तक्रारी

फेसबुकवरून खंडणी मागण्याचे प्रकार - २०़

फेसबुक: इन्स्टाग्रामवरुन फसवणूक - ८५३

ट्विटरवरुन फसवणूक - ४२

एकूण सोशल मीडियाबाबतच्या ९ मे २०२१ अखेरच्या तक्रारी - १३४०

.......

सोशल मीडियाबाबतच्या तक्रारी २०२० - २१४१

सोशल मीडियाबाबतच्या तक्रारी २०१९ - ८२८

.....

सोशल मीडियावर वावरताना घ्या काळजी

फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचा वापर करताना अधिकाधिक काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत व कितीही जवळचा असला तरी त्याला आपले आपत्तीजनक फोटो दुसर्‍याला पाठवू नका. गिफ्ट पाठविले असल्याचे कोणी सांगत असेल तर तो नक्की सायबर चोरटा असेल. फेसबुकवरून कोणी अडचण सांगून पैशांची मागणी करीत असेल तर अगोदर वैयक्तिक संपर्क साधून खात्री करा.

- दगडु हाके

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पुणे

Web Title: Beware if money is demanded from Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.