Coronavirus Pune : सावधान...वाद घालाल तर तुमचा येईल ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट; वारजे माळवाडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:42+5:302021-04-24T15:58:40+5:30
पुणे : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एका महिला रुग्णाने महापालिकेच्या दोन वेगवेगळ्या तपासणी केंद्रावर कोरोना ...
पुणे : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एका महिला रुग्णाने महापालिकेच्या दोन वेगवेगळ्या तपासणी केंद्रावर कोरोना टेस्ट करून घेतली. सुरुवातीला एका केंद्रावर आरटीपीसीआर टेस्ट केली.रिपोर्टला वेळ लागेल म्हणून दुसऱ्या सेंटरवर रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखविण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णाला चांगलाच मानसिक त्रासातून जावे लागले.
अचानक त्रास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी कोरोनाची टेस्ट करावयास सांगितली. त्यानुसार प्रथम एस. एन. डी. स्वॅब सेंटर येथे आरटीपीसीआर टेस्ट केली. या टेस्ट रिपोर्ट मिळण्यास वेळ लागले, असे सांगण्यात आले. म्हणून तेथील कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने वारजे-माळवाडीतील अरविंद गणपत बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर अँटिजेन टेस्ट केली. पंधरा मिनिटांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. व तसेच दिलेल्या ११४ नंबरच्या पावतीवर पॉझिटिव्ह असल्याची खून करण्यात आली. त्यामुळे घाबरून रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. मात्र, बेड मिळाला नाही. त्याबरोबरच पत्नीला बरे वाटू लागले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच ठेवण्यात आले. असे त्या महिलेचे पती प्रतापसिंग रमेशसिंग राजपूत यांनी सांगितले.
दरम्यान, एस. एन. डी. स्वॅब सेंटरवरून अरविंद गणपत बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर अँटिजेन टेस्ट करण्यापूर्वी तेथील स्वॅब सेंटरमधील प्रमुखासोबत वादावादी झाली होती. पत्नीला त्रास होत असल्याने घाबरलो होतो. त्यामुळे टेस्ट लवकर करावी. जेणेकरून पुढील उपचार तत्काळ घेता येतील असे मत होते. मात्र प्रमुखाला कोणत्या गोष्टीचा त्रास झाला हे समजले नाही. बाचाबाची झाल्याने त्याने पोलिसांना बोलावले. तक्रारीत काही तथ्य नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी वाद मिटवला. त्यानंतर टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तेथून तत्काळ बेड मिळविण्यासाठी धावाधाव सुरू केली. बेड मिळाला नाही.
बरेही वाटू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने पत्नीला घरी घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी आरटीपीसी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे समजले. त्यामुळे बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर वाद झाल्याने त्याने मुद्दाम रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला की खरंच आरटीपीआरचा रिपोर्ट खोटा आला. हे समजण्यास मार्ग नाही, असे राजपूत यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.