विजयी मिरवणुका काढण्याचे धाडस कराल तर सावधान; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 10:42 AM2021-01-17T10:42:06+5:302021-01-17T10:43:48+5:30
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.१८ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे.
शेलपिंपळगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर विजयी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्याचे धाडस कराल तर सावधान. कारण, विजयोत्सव मिरवणुका काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.१८ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे बारापासून रात्रीचे बारापर्यंत संपूर्ण दिवसात विजयी मिरवणूक काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विना परवानगी फ्लेक्स अथवा बॅनर लावू लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तर सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सहापर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पान टपरी या सेवा बंद राहतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने विजयी मिरवणुकांवर व डीजेच्या दणदणाटावर बंदी घातल्याने गावोगावच्या ग्रामीण हौशी कलाकारांचा हिरमोड झाला आहे. मात्र कोरोनाच्या काळात जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत गरजेचा आहे.