सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:18 IST2024-12-22T13:18:32+5:302024-12-22T13:18:42+5:30

पतंगाबरोबर असलेला दोरा नागरिकांच्या गळ्याभोवती, तोंडावर गुंडाळला जाऊन नागरिकांना गंभीर जखमा होत आहेत

Beware! Manja will attack two-wheelers; Youth injured in stabbing | सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

सावधान! दुचाकीस्वारांनाे मांजा तुमचा करेल घात; शिवण्यात युवक जखमी

शिवणे : शिवण्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा चेहरा मांजाने कापल्याची घटना घडली. राजेश धावडे (रा. उत्तमनगर) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. मांजावर बंदी असतानाही शहरासह उपनगरात विविध ठिकाणी अनधिकृतपणे मांजाची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी आता सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शाळेला सुट्टी लागल्यामुळे मुले सध्या सर्वत्र पतंग उडवत असल्याचे दिसत आहे. उंच आकाशात जागोजागी पतंग दिसत आहेत. परंतु, ह्या पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. पतंग खेळत असताना कट होणाऱ्या पतंगाबरोबर असलेला दोरा नागरिकांच्या गळ्याभोवती, तोंडावर गुंडाळला जाऊन नागरिकांना गंभीर जखमा होत आहेत. शिवणे येथील एका नागरिकाच्या गळ्याला कापल्याची घटना ताजी असतानाच उत्तमनगर येथील राजेश धावडे यांना मांजामुळे गालावर गंभीर जखम झाली आहे.

प्रशिक्षणार्थी विमानांना मांजामुळे घडू शकताे अपघात

शिवणे, उत्तमनगर भागाला लागूनच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. येथे विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशावेळी अचानक आलेल्या पतंगामुळे दुर्घटना घडू शकते. परिसरातील नागरिकांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून, पोलिस प्रशासनाने अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संध्याकाळी कामावरून घरी येत असताना अचानक मांजा गळ्याभोवती आला. गाडीवर असल्यामुळे दोन मिनिटे काही कळलेच नाही. मांजा बाजूला करताना जीभ कापली गेली तसेच बोटाचे नख कापले गेले आणि गालावरदेखील गंभीर जखम झाली. माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, अशा प्रकारचे मांजा वापरण्यास बंदी असताना हे मांजा कुठून आणतात, ह्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. - राजेश धावडे, उत्तमनगर

प्रिंटींगच्या कामाची डिलिव्हरी देऊन घरी निघालो आणि कर्वेनगर पुलावर आलो असता, मानेला काहीतरी कापल्यासारखे जाणवले. म्हणून थांबून पाहतोय तर अंगावर रक्ताची धार सुरू हाेती. अंगाची थरथर आणि परिवार समोर दिसू लागला. कसाबसा धीर धरून अंगातील टी-शर्ट तसाच वर घेऊन एका हाताने मानेला धरला आणि थेट वारजेतील माई मंगेशकर रुग्णालय गाठले. मांजा विकणारे आणि वापरणारे अशा दोघांवर कारवाई व्हावी, अन्यथा असे अपघात होत राहतील. - भास्कर बेलखेडे, शिवणे, इंगळे काॅलनी

Web Title: Beware! Manja will attack two-wheelers; Youth injured in stabbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.