"सावधान नवले ब्रीज पुढे आहे..." तीव्र स्वरुपाचा उतार आणि उडणाऱ्या कावळ्याचादेखील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:21 PM2022-11-24T12:21:23+5:302022-11-24T12:23:41+5:30
"सावधान, पुढे नवले पूल आहे" अशा आशयाचे फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत...
- कल्याणराव आवताडे
धायरी (पुणे) : नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात. परंतु, अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होते, चर्चा बैठका होतात अन् त्यानंतर पुन्हा काहीच होत नसल्याचा आरोप करीत प्रवासी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. त्याबरोबरीने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गावर "सावधान, पुढे नवले पूल आहे" अशा आशयाचे फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत.
मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्रीदेखील पुन्हा दोन अपघात झाले. सोमवारीदेखील अपघातांची मालिका सुरूच राहिली. यापूर्वीदेखील अनेक अपघात घडूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर हे फलक लावण्यात आले आहे.
या फलकावर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचादेखील फोटो लावण्यात आला आहे. यावर ''सावधान... पुढे नवले ब्रीज आहे'' अशी रचना केली असून, जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटपर्यंत हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे.
कात्रज बोगद्यापासून ते थेट नवले पुलापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. याचा उताराचा फायदा घेण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी अवजड वाहनांचे चालक गाडी न्यूट्रल करतात. किमान हा ६ किलोमीटरचा पट्टा असल्याने वाहनालादेखील अपेक्षित वेग मिळतो. मात्र, हीच इंधनाची बचत अनेकांच्या जिवावर बेतली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदने दिली, आंदोलने केली. मात्र, ढिम्म प्रशासनाला केवळ अपघात झाल्यानंतरच जाग येते. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनामुळे कित्येक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. किमान या फ्लेक्समुळे तरी वाहनचालक सतर्क होतील व प्रशासनदेखील थोडे जागे होईल, याच उद्देशाने हे फलक लावण्यात आले आहेत.
- भूपेंद्र मोरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे शहर