भटक्याबराेबरच पाळीव कुत्र्यांपासून सावधान! गेल्या वर्षभरात २८ हजार पुणेकरांना चावा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 7, 2023 04:45 PM2023-06-07T16:45:13+5:302023-06-07T16:45:27+5:30
भटकी आणि पाळीव कुत्र्यांचा चावा ही शहरातील एक गंभीर समस्या
पुणे : भटकी कुत्री आणि पाळीव कुत्र्यांचा चावा ही शहरातील एक गंभीर समस्या बनली आहे. परंतू,जेव्हा कुत्रे चावतात तेव्हा ते भटकेच असल्याचे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुक आहे. कारण, पुणेकरांना वर्षभरात जितके श्वानांचे चावे घेतले जातात त्यामध्ये पाळीव कुत्र्यांच्या चाव्यांचे प्रमाण ४० टक्के आहे. उर्वरित चावे हे भटक्या कुत्र्यांचे आहेत. यामुळे, भटक्यांबराेबरच पाळीव कुत्रयांपासूनही सावध राहावे, असे दिसून येते.
पुण्यात भटक्या कुत्रयांची समस्या पूर्वीपासूनच आहे. सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणारे अन्न, कचराकुंडया येथे टाकल्या गेलेल्या अन्नावर ही भटकी कुत्री गुजरान करतात. या भटक्या कुत्र्यांची संख्या ही सध्या सुमारे १ लाख ८० हजार इतकी आहे. तर पाळीव कुत्रयांची संख्या ८० हजार आहे. यामुळे दरराेज शहरात ७५ जणांना दरराेज चावे घेतले जातात. त्या सर्वांना उपचार घ्यावे लागतात.
गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबदरम्यान पुणे शहरात एकुण २८ हजार २८ जणांना चावा घेतला. त्यापैकी, ११ हजार ४५९ चावे हे पाळीव कुत्र्यांपासून झालेले आहेत. तर, १६ हजार ५५९ चावे हे भटक्या कुत्र्यांपासून झालेले आहेत. म्हणजेच पाळीव कुत्र्यांची संख्या ही ४० टक्के तर भटक्या कुत्र्यांची संख्या ६० टक्के इतकी आहे. ही बाब अधिक गंभीर आहे. म्हणून आपल्या पाळीव कुत्र्याबाबत अधिक दक्षता घेणे आवशक आहे.
संख्या घटतेय चावे वाढतायेत
सन २०१८ राेजी पुणे महापालिकेच्या क्षेत्रात ३ लाख १८ हजार भटक्या कुत्र्यांची संख्या हाेती. आता ती संख्या घटत आहे. परंतू, शहरात ही श्वानांच्या चाव्यांची संख्या दिवसेंदिवस मात्र वाढत आहे. हा विराेधाभास आहे. सन २०१७ ला १० हजार, २०१८, १९ आणि २०२० ला देखील दरवर्षी १२ हजार चावे झाले. मात्र, २०२१ मध्ये ही संख्या झपाटयाने वाढली आहे. सन २०२१ ला ही संख्या १८ हजारांवर गेली तर २०२० ला तब्बल २८ हजारांवर गेली आहे. यावरून महापालिकेच्या म्हणण्यानुसार भटक्या कुत्र्यांची संख्या कमी हाेत असली तरी चाव्यांची संख्या मात्र काही कमी हाेताना दिसत नाही.