पुणेकरांनो, सावधान! डेंग्यू, टायफाईड, चिकनगुनिया, कावीळचा धोका वाढतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:34 PM2021-08-18T19:34:58+5:302021-08-18T19:40:57+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाईड चिकनगुनिया, कावीळच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
पुणे : शहरात यावर्षी जानेवारी महिन्यापासून डेंग्यूच्या १३५ तर चिकनगुनियाच्या ८४ रुग्णांचे निदान झाले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. खाजगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज विषाणूजन्य आजारांची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
लॉकडाऊन कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे आणि उघड्यावरील खादयपदार्थ खाणे बंद झाले होते. त्यामुळे मागील वर्षी कोरोना काळात ब-याच विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले होते. परंतु, आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफुड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाईड चिकनगुनिया, कावीळच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात.
जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘गेल्या दोन आठवड्यांत या आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. दररोज बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रूग्ण हे तापाचे असतात. या रूग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कोरोना रूग्ण कमी होत असल्याने या रूग्णसंख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.’
पॅथॉलॉजिस्ट डॉ. किर्ती प्रकाश कोटला म्हणाले, ‘पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाइड आणि चिकनगुनिया रूग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. जुलै २०२१ मध्ये १० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर १ चिकणगुनियाचा रूग्ण आढळून आला होता. आता या रूग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून दररोज डेंग्यू, टायफाइड आणि चिकनगुनियाचे १० ते १५ रूग्ण चाचणीसाठी येतात. यातील ५० टक्के रूग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो आहे. वेळीच निदान झाल्यास पटकन उपचार होऊन रूग्ण बरा होऊ शकतो. म्हणून ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणे गरजेचे आहे.’
चिकनगुन्याचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप हे आहे. या आजाराची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण त्यासोबत सांध्यांच्या तीव्र वेदना, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही देखील लक्षणे आहेत. डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांमागे दुखणे ही लक्षणे आहेत. याशिवाय डेंग्यूमुळे रक्तस्त्राव होत असल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.
----------------
काय काळजी घ्यावी?
सध्या मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांनी विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते, यामुळे डेंग्यू व चिकनगुनिया हा आजार होतो. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करा, घराबाहेर पाणी साचू देऊ नका, परिसरात वेळोवेळी फवारणी करा आणि डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. म्हणून ताप जास्त दिवस असल्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
------------
डेंग्यूचे रुग्ण :
महिना संशयित पॉझिटिव्ह
जानेवारी २७५ २२
फेब्रुवारी ७९ ०६
मार्च १९१ ०२
एप्रिल १६९ ०१
मे १६२ ०
जून २०१ ०
जुलैै १०७ ८६
ऑगस्ट ८७ १८
---------------
शहरातील आकडेवारी : (जानेवारी ते ऑगस्ट २०२१)
स्वाईन फ्लू - ६५
चिकनगुनिया - ८४
डेंग्यू - १३५
मलेरिया - २