"त्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवा", सुरेखा पुणेकर यांचा राज्यपालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:34 PM2022-12-09T17:34:04+5:302022-12-09T17:34:25+5:30
राज्यपालांनी आपल्या आराध्य दैवताबाबत केलेलं विधान अत्यंत चूकीचं
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घ्यावी अशी अनेकांनी भूमिका मांडली आहे. आता राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवा’, अशी मागणी सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पुणेकर म्हणाल्या, राज्यपालांनी आपल्या आराध्य दैवताबाबत केलेलं विधान अत्यंत चूकीचं आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, अशा प्रकारचे विधान भाजपाबाह्य व्यक्तीने केलं असत तर त्याच्यामागे चौकशीचा फेरा लावला असता, भाजपामध्ये महिलांबद्दलसुद्धा कोणत्याही प्रकाराचा सन्मान राखला जात नाही हे अनेक उदाहरणामधून स्पष्ट होत आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल
आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.