वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे- भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:41 PM2022-12-02T16:41:25+5:302022-12-02T16:42:41+5:30

"पुणे विचारवंतांचे शहर, इथल्या लेखक-वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद..."

Bhagat Singh Koshyari said People of different ideologies should get a platform to express themselves - | वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे- भगतसिंह कोश्यारी

वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे- भगतसिंह कोश्यारी

googlenewsNext

पुणे :पुणे हे महाराष्ट्रातील विचारवंतांचे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लेखक वाचक महोत्सव होत असल्याचा आनंद असून आयोजकांनी स्वत:च्या समाधानासाठी सुरू केलेला पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलने शतकी वाटचाल करावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी त्यांनी दिल्या.

यशदा येथील सभागृहात विश्वकर्मा पब्लिकेशन्स आयोजित '१० व्या इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल-२०२२' (पीआयएलएफ) चे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्याहस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका सुधा मूर्ती, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, लेखक डॉ. विक्रम संपथ, पीआयएलएफच्या संस्थापक डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते 

कोश्यारी आपले अनुभव सांगताना म्हणाले, सर्व वयोगटातील मुले, व्यक्ती भेटायला येतात तेव्हा पुस्तके भेट देतात. अनेक अज्ञात लेखक, कवी लेखन करत असतात. ते जरी स्वत:च्या समाधानासाठी लिहित असले तरी ते साहित्य केव्हातरी वाचले जाईल अशी अशा त्यांना असते. त्यासाठी आपल्यामध्ये वाचन प्रेरणा (रीडींग स्पीरीट) कायम असली पाहिजे, जी अशा महोत्सवांच्या आयोजनातून वाढीस लागते. 

राज्यपाल पुढे म्हणाले, संवादातून चर्चासत्रातून आपल्याला वेगवेगळे विचार समजतात आणि त्यातून समाजातील वास्तवाविषयी माहिती मिळते. प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे विचार असतात. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले पाहिजे. या फेस्टिव्हलमुळे अशाच प्रकारे विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र येत विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल.

फ्रान्सीस बेकन यांच्या म्हटले आहे की वाचन हे माणसाला पूर्ण माणूस बनवते, चर्चांमुळे तो वास्तवदर्शी बनतो तर लेखन माणसाला अचूक किंवा परफेक्ट बनवते. त्यामुळे या फेस्टिव्हलमधील चर्चासत्रांना उपस्थित राहणाऱ्यांत साहित्याविषयी गोडी निर्माण होऊन लेखनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला. लिटररी महोत्सवचे व्यवस्थापन करणे अतिशय कठीण जबाबदारी असून आयोजक अत्यंत सक्षमपणे ती पार पाडत असल्याचे सांगून श्रीमती मूर्ती म्हणाल्या, पुस्तकप्रेमींनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा फेस्टीव्हल मोठा होत आहे. वर्षानुवर्षे तो सुरू रहावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. 

संपथ म्हणाले, एखादी नवीन बाब सुरू करणे  सोपे असते. मात्र ते अव्याहत सुरू ठेवणे अत्यंत कठीण असते. त्याबाबतीत फेस्टिव्हलच्या आयोजकांचे कौतुक केले पाहिजे. पुणे हे संस्कृती, शिक्षण, इतिहासाचे शहर आहे. त्यामुळे या महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी डॉ. मंजिरी प्रभू यांनी फेस्टिवलच्या आयोजनाबाबतची पार्श्वभूमी व भूमिका सांगितली.  प्रारंभी फेस्टिवलच्या सुरुवातीपासूनचा प्रवास दाखवणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक, प्रकाशक, फेस्टिव्हलचे देशी, परदेशी पुरस्कर्ते उपस्थित होते

Web Title: Bhagat Singh Koshyari said People of different ideologies should get a platform to express themselves -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.