व्यंकटेशाशी नातं जोडण्याची प्रक्रिया भागवत धर्मानं शिकविली : अभय टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:40+5:302021-03-04T04:15:40+5:30
पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं ...
पुणे: व्यंकटेश हा प्रकृतीनं वेगळा देव आहे. मात्र असं असूनही त्याच्याशी नातं कसं जोडायचं ही प्रक्रिया भागवत धर्मानं शिकवली. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असं म्हणत व्यंकटेशाला रोजच्या व्यवहारात संत ज्ञानदेवांनी बसवलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसंच यानिमित्तानं शिवोपासनेकडून विष्णूपासनेकडे झालेला प्रवासही आपण समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी केले.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘तिरुपती बालाजी’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विश्वकर्मा पब्लिकेशनचे मनोहर सोनवणे आणि दीपक करंदीकर लिखित ‘तिरुपती’ या कादंबरीचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. रमण चितळे, समीक्षक रुपाली शिंदे, प्रा. श्याम भुर्के, गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, अध्यक्ष अशोक कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
टिळक म्हणाले, ‘आपल्याकडे अवतार ही संकल्पना आहे. म्हणजेच पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकतत्त्व काळाच्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहणे असा त्याचा अर्थ आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘देवालये श्रीमंत होणं आणि आपल्याकडे सर्वांत जास्त कुपोषित मुलं असणं याचं चिंतन होणं गरजेचं असून देशाचं सामाजिक सांस्कृतिक विघटन टाळण्यासाठी संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे आहे.’
कार्यक्रमात राधिका रमण चितळे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार, उषा अशोक माडेकर आणि डॉ. सुनीता दिवाकर यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार, तर पंडित वसंत गाडगीळ यांना आदर्श समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले. डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.
......