भाग्यश्री फंडने गाजविला कळंबचा आखाडा
By admin | Published: May 7, 2017 02:16 AM2017-05-07T02:16:36+5:302017-05-07T02:16:36+5:30
कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या महिला कुस्तीच्या जंगी मैदानात अहमदनगर च्या भाग्यश्री फंड ने सांगलीच्या किरण ला आसमान
लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या महिला कुस्तीच्या जंगी मैदानात अहमदनगर च्या भाग्यश्री फंड ने सांगलीच्या किरण ला आसमान दाखवले. या वेळी भाग्यश्रीने जमलेल्या असंख्य कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कळंब येथील फडतरे उदयोग समूहाच्या वतीने स्व. बाबासाहेब फडतरे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या वेळी माती व मॅट अशा दोन्ही प्रकारच्या ३०० कुस्त्या पार पडल्या. फडतरे उद्योगसमूहाच्या वतीने या वर्षी महिलांच्या मॅटवरील कुस्त्या भरवल्याने या मैदानाला विषेश महत्त्व प्राप्त झाले होते. या मैदानात महिलांच्या मॅटवरील दहा कुस्त्या पार पडल्या. यामध्ये अहमदनगरच्या भाग्यश्री फंडने सांगलीच्या किरणला आसमान दाखवले. या वेळी विजयी भाग्यश्रीने आनंदात हवेत दोन ‘छलांग’ मारल्या.
जळगावच्या रूपाली महाजनने सोलापूरच्या राधिका चव्हाणला चितपट केले. सोलापूरच्या निकिता मोरेने नगरच्या धनश्री फंडला चितपट केले.
सोलापूरच्या स्नेहल वायदंडेने बीडच्या प्रतीक्षा मुंडेचा पराभव केला. येथील महिलांच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेमध्ये दहा कुस्त्या नेमल्या होत्या. दरम्यान, यंदा कळंबसारख्या ग्रामीण भागात प्रथमच फडतरे उद्योगसमूहाच्या वतीने महिलांच्या कुस्त्या आयोजित केल्या होत्या. ग्रामीण भागातील मुलींना हा एक आदर्श आहे.
भागात प्रथमच महिलांच्या कुस्ती स्पर्धा होत असल्याने कुस्तीशौकिनांनी दुपारपासूनच मैदानावर गर्दी केली होती. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
या कुस्ती क्षेत्रातदेखील मागे
राहू नये, या उद्देशाने कळंबसारख्या ग्रामीण भागात महिलांच्या कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत, असे मत फडतरे उद्योगसमूहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी या वेळी सांगितले.
मी नगर जिल्हयातील राहुरी येथील आहे. मी १२ वी विज्ञान शाखेत शिकते. माझे वय १८, तर वजन ४४ किलो आहे. एका वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळले. परंतु, मला एकाच वेळी रौप्यपदक मिळाले. भविष्यात पुढे राष्ट्रीय तसेच आॅलिंपिकला खेळण्याची इच्छा आहे.
- रूपाली वायदंडे
अहमदनगर येथील भाग्यश्री फंड जोग महाराज व्यायामशाळा आळंदी येथे प्रशिक्षण घेत आहे. भाग्यश्री ही इंग्राजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. तिचे वय १३ वर्षे असून वजन ५४ कि.ग्रॅ. आहे. भाग्यश्री वारजे माळवाडी येथे एकदा राष्ट्रीय पातळीवर खेळली आहे. या वेळी तिला रौप्य मिळाले आहे. तसेच वरिष्ठ गटातून पुणे महापौर केसरी या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले आहे. मी एकदा व्यायामाला सुरुवात केल्यानंतर १ हजार जोर पूर्ण होईपर्यंत थांबत नाही. या वर्षी सबज्युनियर नॅशनल स्पर्धेत खेळणार आहे. तसेच २०२४ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करणार असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री फंडने ‘लोकमत’शी बोलताना दिली.