विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

By विवेक भुसे | Published: May 24, 2023 04:02 PM2023-05-24T16:02:42+5:302023-05-24T16:04:59+5:30

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता...

Bhai Thakur along with three acquitted in Virar builder Suresh Dubey murder case | विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

googlenewsNext

पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’कायद्याअंतर्गत दाखल असलेला देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व परिसरात भाई ठाकूर याची दहशत होती. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ॲक्टव्हीज (प्रिव्हेंन्शन)ॲक्ट) नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४ मध्ये टाडा कायद्यातील विविध कलमे तसेच बेकायदा शस्त्रात्र बाळगल्या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सुदीप पासबोला, ॲड. सुधीर शहा, ॲड. रोहन नहार, ॲड. प्रीतेश खराडे, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून करण्यात आलेला ग्राह्य धरुन न्यायालयाने भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

देशातील शेवटचा टाडा खटला
देशातील या शेवटच्या टाडा खटल्याची सुनावणी २००५ मध्ये सुरु झाली होती. सरकार पक्षाने ८० हून अधिक साक्षीदार तपासले. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होती. सध्या ५ आरोपींविरुद्ध सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान दोघांचे निधन झाले.

त्यात भाई ठाकूर, त्याचा भाऊ दीपक ठाकूर आणि गजानन पाटील हे तीन आरोपी होते. भाई ठाकूर विरुद्ध 302, 120 ब आणि टाडा आणि इतर दोन आरोपी विरुद्ध फक्त टाडा चा गुन्हा दाखल होता. कोर्टाने कुठलाही कट, जमीन बळकावणे दहशतवादी कारवायांचा भाग असू शकत नाही असे निरीक्षण नोंदवित तिघांची विशेष न्यायाधीश एस.आर नावदंर यांनी निर्दोष मुक्तता केली. या केसमध्ये एकूण ११० साक्षीदार होते. १९८९ च्या या खटल्यामध्ये या तिघांची नावे नव्हती. १९९३ ला टाडा लावला तेव्हा या तिघांच्या नावाचा समावेश करण्यात आला, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड. रोहन नहार यांनी दिली.

Web Title: Bhai Thakur along with three acquitted in Virar builder Suresh Dubey murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.