भाई वैद्य यांनी आपले जीवन तळागाळातील घटकांसाठी समर्पित केले : डॉ. बाबा आढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:01+5:302020-12-23T04:08:01+5:30
पुणे : समाजातील शोषित आणि वंचित घटकांबद्दल भाई वैद्य यांना कायमच अस्वस्थता वाटत असे. समाजाच्या तळागाळातील ...
पुणे : समाजातील शोषित आणि वंचित घटकांबद्दल भाई वैद्य यांना कायमच अस्वस्थता वाटत असे. समाजाच्या तळागाळातील घटकाबद्दल त्यांना तळमळ होती. या घटकांसाठी भाई वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. काम करीत असताना त्यांनी कधीच आपल्या समाजवादी मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या जीवनकार्यातून आदर्श निर्माण केला, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेना केंद्रीय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (दि.१८) हमाल भवन येथे दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘भाई वैद्य एक सामाजिक पर्व’ या लघुपटाचे लोकार्पण डॉ. आढाव यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांनी भूषविले. चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर आणि चित्रपट लेखक डॉ. अनिल सपकाळ उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले की, समाजवादी लोकशाहीचा ध्यास घेतलेल्याला भाई वैद्य यांनी मूल्याधिष्ठीत जीवनाला कायमच प्राधान्य दिले. भाई वैद्य यांचे जीवन म्हणजे आदर्श सत्याग्रही जीवन होते.
यावेळी डॉ. अभिजीत वैद्य यांनी भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. समितीचे सदस्य प्रमोद दळवी यांनी सूत्रसंचालन केले. कमलेश हजारे यांनी आभार मानले.