‘स्वरसंजीवनातून’ भजनरंगाची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:15 AM2017-08-01T04:15:05+5:302017-08-01T04:15:05+5:30
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... माझे चित्त तुझे पायी... काहे मोरी बात छेडत नंदलाला... या भजन आणि शास्त्रीय रागांतील रचनांची स्वरानुभूती रसिकांनी घेतली.
पुणे : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल... माझे चित्त तुझे पायी... काहे मोरी बात छेडत नंदलाला... या भजन आणि शास्त्रीय रागांतील रचनांची स्वरानुभूती रसिकांनी घेतली. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भजनांच्या विविध नाविन्यपूर्ण रचना सादर करत गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी श्रोत्यांवर स्वरमोहिनी घातली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,
सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा
मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वर संजीवन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात यमन रागातील ‘कहे सखी कैसे के
करिये’ या रचनेने झाली. शास्त्रीय संगीतात मधुकंस रागातील रचनांची पेशकेश देखील यावेळी झाली. संत नामदेव यांची ऐसे पंढरीचे स्थान, याहूनी आणिक आहे कोण या पंढरीचे वर्णन असलेल्या रचलेला श्रोत्यांनी विशेष दाद दिली. संत रामदासांनी प्रभू श्रीरामावरील केलेल्या ध्यान लागते रामाचे, दु:ख हरले जन्माचे या अभंगात रसिक तल्लीन झाले.
मैफलीच्या उत्तरार्धात संगीता जोशी यांनी लिहीलेल्या व केदार जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या गायक कलावंताच्या मनोगतात्मक गीताचे सादरीकरण झाले. ही सूरांची बिल्वपत्रे, वाहतो मी भक्तीभावे या गीतांतून कलावंताच्या मनात सुरु असलेल्या विचारांचे
सार उपस्थितांसमोर उलगडले. केदार पंडित (तबला), तन्मय देवचके (हार्मिनियम), अपूर्व
द्रविड (तालवाद्य), मृण्मयी
फाटक व मुग्धा गावकर यांनी गायनसाथ दिली.