भादलवाडीची पाणीपातळी घटली!
By admin | Published: April 3, 2015 03:18 AM2015-04-03T03:18:59+5:302015-04-03T03:18:59+5:30
भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे
पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावामधील पाणीपातळीत घट होत आहे. याचा परिणाम शेती, मत्सव्यवसाय व पक्ष्यांच्या विणीच्या हंगामावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विहिरी, विंधन विहिरी, तलाव यामधील पाणीपातळीत घट झाल्याने खऱ्या अर्थाने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच विजेचे भारनियमन वाढल्याने शेतांमधील पिकांना फटका बसला आहे.
तलावात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. पिकांना दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणावर होतो. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी तलावात अल्पप्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर खडकवासला कालव्याच्या आवर्तनामधून पाणी आलेले नाही.
सध्या तलावात छोटे मासे आहेत. आगामी काळात तलावामध्ये पाणी न सोडल्यास माशांची वाढ होणार नाही. परिणामी तलावातील मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पाण्याअभावी चित्रबलाक पक्ष्यांच्या वसाहतीलाही धोका निर्माण झाला आहे.
जलसंपदा खाते प्रत्येक आवर्तनावेळी भादलवाडी तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ करते. या तलावावर भादलवाडी, डाळज, पिलेवाडी येथील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती अवलंबून आहे. पाणीपातळी घटली असताना या तलावामध्ये पाणी का सोडले जात नाही, असा सवाल होत आहे.