भामा-आसखेड जलवाहिनी वाद शिगेला
By admin | Published: June 23, 2017 04:43 AM2017-06-23T04:43:23+5:302017-06-23T04:43:23+5:30
नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असणारे भामा आसखेड जलवाहिनीचे आणि धरणात सुरू असणारे जॅकवेलचे काम आज प्रकल्पबाधित शेतकऱ्यानी बंद पाडले. आता या जलवाहिनी विरोधात निर्णायक लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. आमच्यावर मावळप्रमाणे गोळीबार केला तरी चालेल पण आमच्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
आसखेड फाटा परिसरात सुरू असणारे जलवाहिनी टाकण्याचे काम आणि भामा आसखेड धरणाच्या जलाशयात सुरू असणारे जॅकवेलचे काम संतप्त प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले.
भामा आसखेड प्रकल्पामधील मधील १४१४ प्रकल्पग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करा, १०० टक्के शेतकऱ्यांना पाणी परवाने द्या, कालवे रद्द केल्याने लाभ क्षेत्र रद्द करून जमिनीवरील संपादनाचे शिक्के काढा, प्रकल्पग्रस्तांना दाखले द्यावेत, भविष्यात धरणाची उंची वाढणार नाही याची लेखी हमी द्यावी, अशा विविध मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावोगावच्या शेतकऱ्यांंनी मांडल्या. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीचे आणि जॅकवेलचे काम करू द्यायचे नाही असा पवित्रा या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी घेतला आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जी महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे त्यात वारंवार काम बंद करून अडथळा येत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, आमदार महेश लांडगे, जगदीश मुळीक, सुरेश गोरे यांच्यासह अधिकारी वर्गाची करंजविहिरे येथे बैठक घेतली व त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी केलेल्या घोषणा फसव्या असून त्यात आजतागायत काहीही कार्यवाही झाली नाही तसेच त्या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना बोलू दिले नाही असाही सूर शेतकऱ्यांचा आहे.
या आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिकेच्या प्रवीण गेडाम, कडू यांनी आंदोलकांना फोन करून काम सुरू ठेवण्याचे आवाहन केल. तर याच वेळी भाजपच्या एका संघटन मंत्र्याला फोन लावून देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
जॅकवेलच्या कामाच्या ठिकाणी आयटीडी कंपनीचे राजेंद्र कामठे, अभिजीत नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आज जॅकवेलचे काम बंद करताना सत्यवान नवले, माजी सरपंच किसन नवले, ग्रामपंचायत सदस्य किसन नवले, तानाजी नवले, बबन नवले, नामदेव पानमंद, कचरू देशमुख, माऊली जाधव, हरीचंद्र गोपाळे, विजय नवले, पप्पू नवले, तुकाराम नवले, लक्ष्मण नवले आदी उपस्थित होते.
पुढाऱ्यांनी केले हात वर ? : निवडणूक आली की जनतेच्या बाजूने गोडगोड बोलायचे याचा खास प्रत्यय भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतक?यांना येत आहे. निवडणूकी अगोदर आम्ही अमुक करू तमुक करू असे बोलणारे पुढारी आता शेतकऱ्यांना सोडून बाजूला झाल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला विरोध करणारी जहाल शिवसेना अचानक मवाळ कशी झाली ? सत्ताधारी भाजपा काही बोलत का नाही? विरोधी असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मुद्द्यावर न बोलता लांबूनच शेतकऱ्यांचा आक्रोश पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणताही नेता भांडताना दिसत नाही.