‘भामा आसखेड’चे पाणी रोखले!

By admin | Published: November 10, 2015 01:52 AM2015-11-10T01:52:29+5:302015-11-10T01:52:29+5:30

कोणतीही पूर्वसूचना न देता भामा-आसखेड धरणामधून ६ हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांनी सोमवारी रोखले.

Bhama Ashkhed 'water stopped! | ‘भामा आसखेड’चे पाणी रोखले!

‘भामा आसखेड’चे पाणी रोखले!

Next

पाईट : कोणतीही पूर्वसूचना न देता भामा-आसखेड धरणामधून ६ हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांनी सोमवारी रोखले. जर हे पाणी सोडले असते तर नदीकाठच्या गावांना पुरामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. शेतकऱ्यांच्या सावध भूमिकेमळे ऐन दिवाळीमध्ये होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला. यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आज उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याचे पुणे पाटबंधारे मंडळाने अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन केले होते. याबाबत शेतकऱ्यांना समजल्यावर त्यांनी हे पाणी रोखले. पुणे पाटबंधारे विभाग धरणाच्या सांडव्यामधून येत्या ५ दिवसांमध्ये २.४ टी.एम.सी पाणी सांडव्यामधून, तर सर्व्हीस गेटमधून २. ४५ टी.एम.सी. पाणी सोडणार होते.
याबाबत धरणाखालील एकाही गावामध्ये पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सांडव्यामधून पाणी सोडण्यात येण्याचा हा पहिलाच प्रकार होता. सुमारे ६ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाणार होते. जर तसे झाले असते, तर पाणी नदीपात्रातून बाहेर पडले असते.
शिवाय धरणाखालील सर्व आठही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे गेटव्हॉल्व्ह खोलले नव्हते. या पााण्याने मोठा साठा नदीपात्रात जमा झाला असता. शिवाय आठही केटी वेयर वाहून जाण्याचा धोका होता. शिवाय शेतकऱ्यांच्या मोटारींनाही धोका झाला असता. शेतकरी व शासन यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असते. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांनी पाणी सोडणे रोखल्यामुळे टळला.
या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंदोलनामध्ये माजी जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, भाजप अध्यक्ष दिलीप वाळके, चांगदेव शिवेकर, सुभाष मांडेकर, महादेव लिंभोरे, दत्ता होले, किरण चोरघे, जयसिंग दरेकर, नवनाथ दरेकर, किसन नवले, सत्यवान नवले, पप्पु राळे, काळूराम कोळेकर, अंकुश कोळेकर, समीर राळे, साहेबराव कोळेकर, अनंदा अवारी व शेतकरी उपस्थीत होते. (वार्ताहर)

1जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीनंतरच पाणी सोडण्याच्या प्रशासनास सूचना केल्या असताना अधीक्षक अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता जाधव यांच्या झालेल्या बैठकीनुसार पाणी घाईघाईने सोडण्याचा निर्णय रात्री घेतला गेला. यामुळे प्रशासनास नदीकाठच्या गावांना सूचना देता आल्या नाहीत.

2शरद बुट्टे-पाटील यांनी ही गंभीर बाब तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सांगितल्यावर, महसूल यंत्रणेने आपणास ही बाब माहीत नसल्याचे सांगितले. नदीकाठच्या लोकांना याची कल्पना नाही. यामुळे पाणी सोडण्याची घाई करू नये, असे जलसंपदा अधिकारी यांना कळविल्याबाबत आमदार सुरेश गोरे यांनीदेखील पाणी सोडू नका, अशा सूचना केल्या.
खेड तालुक्याच्या कळमोडी धरणातून शनिवारी सायंकाळी १९४ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी चासकमान धरणात येत असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. कळमोडीतून चासकमानमध्ये व तेथून उजनी धरणासाठी पाणी सोडण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.
कळमोडी धरणाची पाणीक्षमता दीड टीएमसी असून, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. या धरणातील एक टीएमसी पाणी जरी कमी झाले तरी ऐन उन्हाळ्याअगोदरच या भागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उजनीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये भामा आसखेड व चासकमान धरणांची नावे होती. परंतु कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये का सोडले, हा प्रश्न अनुउत्तरीत आहे.
सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चासकमान धरणात रविवार ८ नोव्हेंबर रोजी ७८.५० टक्के तर सोमवार ९ नोव्हेंबर रोजी ७८.५७ टक्के झाले आहे. कळमोडी धरणातून जे पाणी सोडले त्याच्या नियोजनाबाबत बैठक घेणार असल्याचे शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी सांगितले.

Web Title: Bhama Ashkhed 'water stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.