भामा आसखेड धरण ८७ टक्क्यांवर; सात दिवसांत पंचेचाळीस टक्के पाणीसाठा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:24 PM2022-07-21T21:24:32+5:302022-07-21T21:25:01+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा
आसखेड : दौंड, खेड, शिरूरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (तालुका -खेड) धरणात सध्या ८७.१४ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी यावेळी धरणात ४८.०१ टक्के इतकाच पाणी साठा होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा आहे. तर मागील सात दिवसांत जवळपास पंचेचाळीस टक्के पाणीसाठा वाढला आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यात चाकणच्या पश्चिम भागात भामा नदीवर मातीचे धरण आहे. धरणाची क्षमता ८ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात जूनपासून ५७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात वळवाच्या आणि मृग नक्षत्रातील पावसाने दडीच मारली होती. परंतु ९ जुलैनंतर मान्सूनच्या पावसाची संततधार सुरू झाली. मग पाणीसाठा झपाट्याने वाढला; परंतु काल (दि. २०) पासून पावसाचा जोर कमी झाला असून फक्त ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ७.०९ टीएमसी म्हणजे ८७.१४ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा हा ६.६८ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात फक्त ४८.०१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच यावर्षी हा साठा ३९ टक्केने अधिक आहे.
धरणातील पाणीसाठा ९५ टक्केच्या पुढे गेल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून धरणातून कधीही पाणी सोडले जाईल, अशी माहिती भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता नीलेश घारे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.