पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:38 PM2019-03-07T18:38:47+5:302019-03-07T18:45:03+5:30
प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
आंबेठाण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल व जलवाहिनीचे काम आज ( दि. ७) रोजी दुपारी बंद पाडले.गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भविष्यातही आपल्या मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानेच हे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज ( दि.७) करंजविहिरे येथे बैठक घेतली. यावेळी जॅकवेल व जलवाहिनीचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लक्ष्मण पासलकर म्हणाले, काम बंद करणे हाच शेवटचा पर्याय असून,१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाही.याच सभागृहात आमदारांनी शब्द दिला होता. प्रत्येक खातेदाराला खेड तालुक्यातील जमीन मिळाली पाहिजे. मात्र अजून एकही धरणग्रस्त शेतकऱ्याला जमिनी मिळाल्या नाहीत.पहिल्यांदा आमचे प्रश्न सोडवा अन् मग खुशाल पुण्याला पाणी द्या.. पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही याप्रमाणे जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केल्याशिवाय शासनाचे डोळे उघडणार नाहीत, असे बैठकीत ठरल्याने आजपासून काम बंद करण्यात आले आहे.आता आम्हाला अटक करायची तर खुशाल करा आता आम्ही मागे हटणार नसल्याचे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले, असे उपस्थित धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस लक्ष्मण पासलकर,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले,देवीदास बांदल,गजानन कुडेकर,संदीप देशमुख,सुदाम शिंदे,किसन नवले,गणेश जाधव,पंडित मरगज यांच्यासह जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर,मणेर,खाडे या पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस अधिकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.