भामा-आसखेडचा तिढा सुटला

By admin | Published: March 31, 2016 03:05 AM2016-03-31T03:05:13+5:302016-03-31T03:05:13+5:30

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेले भाम-आसखेड धरण ते पुण्यापर्यंतच्या पाइपलाइनचे काम अखेर रविवार, ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर

Bhama-Axhed was released | भामा-आसखेडचा तिढा सुटला

भामा-आसखेडचा तिढा सुटला

Next

पुणे : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेले भाम-आसखेड धरण ते पुण्यापर्यंतच्या पाइपलाइनचे काम अखेर रविवार, ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांचे पुनर्वसन तातडीने करावे; तसेच शेतकऱ्यांनी या पाइपलाइनचे काम थांबवू नये, असा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
भामा-आसखेड प्रकल्पाचे काम आळंदी, खेड, चाकण परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे थांबले होते. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शरद गोरे व इतर नेत्यांकडून केले जात होते. या पार्श्वभूमीवर महापौर प्रशांत जगताप यांनी या प्रश्नांबाबत उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव, सुरेश गोरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, माजी आमदार बापू पठारे व महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेली बैठक यशस्वी ठरली असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
जगताप यांनी सांगितले, ‘ठाकरे यांच्यासमोर भामा-आसखेडचा प्रश्न ठेवला असता, पुणेकरांचे पाणी आपल्याला अडवायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे सांगितले. भामा-आसखेडचे काम लगेच चालू व्हायला हवे, याबाबत त्यांनी शिवाजीराव आढळराव व सुरेश गोरे यांना सूचना केल्या. पाइपलाइनला टॅब देऊन आळंदीला पाणी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याची माहिती या वेळी देण्यात आली. विधिमंडळामध्ये जाऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेली पुनर्वसनाच्या आराखड्याची फाइल आल्यास त्याला एका दिवसात मंजुरी देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनीही दिले आहे. भामा-आसखेड धरणामधून २०० एमएलडी पाणी आपल्याला मिळणार आहे. आळंदीसाठी पाइपलाइनला टॅब दिल्यास, इतर गावांकडूनही तशी मागणी होऊ शकते. त्यामुळे पुणे शहराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे आळंदीसाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकली जाणार आहे.’
नगररस्ता परिसरातील अनेक भागांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. भामा-आसखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा नगर रोड परिसराला केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भामा-आसखेड प्रकल्पाला उशीर होत असल्याने त्या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला होता. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे या पाइपलाइनचे थांबलेले काम पुन्हा सुरू होणार आहे.
(प्रतिनिधी)

महापालिकेचे ४ कोटी रुपये वाचले
भामा-आसखेड प्रकल्पाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आळंदी नगर परिषदेला पुणे महापालिकेने ४ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आळंदी नगर परिषदेला ४ कोटी रुपये देण्याचा भार पुणे महापालिकेवर पडणार नसल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Bhama-Axhed was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.