भांबोलीतील मजूर मृत्यूप्रकरण दडपले?
By admin | Published: December 27, 2016 03:08 AM2016-12-27T03:08:46+5:302016-12-27T03:08:46+5:30
कंपनीत काम करीत असताना भिंत अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात दोषी कोण आहे? याचा शोध न घेता केवळ पैशाच्या जोरावर
आंबेठाण : कंपनीत काम करीत असताना भिंत अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात दोषी कोण आहे? याचा शोध न घेता केवळ पैशाच्या जोरावर प्रकरण दाबून सहीसलामत बाहेर पडण्याचा प्रकार खेड तालुक्यात भांबोली येथे घडला आहे. याशिवाय या कंपनीत टाकण्यात आलेला आणि कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेला मुरूम नक्की कोठून आणि कसा आणला? याचेही उत्तर गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटत असून त्याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा
सुरू आहे.
याबाबत बीट अंमलदार अनिल जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, आमचा पंचनामा सुरू आहे. पीएमचा रिपोर्ट येणे बाकी आहे, ऐवढेच उत्तर त्यांनी दिले. घटनेला महिना होत आला तरी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक २ मध्ये भांबोली (ता. खेड) गावच्या हद्दीत वेस्टर्न हिट फोर्ज ही कंपनी आहे.
या कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या आवारातील जागेत आणि दुसऱ्या कंपनीच्या भिंतीला लागून असणाऱ्या जागेत गटाराच्या लेवलिंगचे काम सुरू असताना या कंपनीमधील भिंत कोसळली आणि त्यात दोन कामगार दबले जाऊन मृत्युमुखी पडले. एक कामगार जखमी झाला होता. दुसऱ्या कंपनीची भिंत आणि या कंपनीची भिंत या अवघे २-३ फुटांचे अंतर होते. या अरुंद जागेत वरील तीनही मजूर काम करताना या कंपनीच्या बाजूकडील सहा ते साडेसहा फूट उंचीची भिंत अचानक या तीनही मजुरांच्या अंगावर कोसळली. त्यात दत्ता कसबे आणि दैवाबाई जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. जेसीबीच्या साहाय्याने पडलेला मुरूम बाजूला करून या तिघांना बाहेर काढण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
हे सर्वजण भोसरी येथील बालाजीनगर परिसरात राहत होते. याबाबतची फिर्याद कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी विशाल राजेंद्र दहापुते यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती.
घटना घडल्यानंतर अनेक दिवस पंचनामा सुरू आहे, असे उत्तर पोलीस खात्याकडून देण्यात येत आहे. नंतर अचानक काही दिवसांनंतर प्रकरण मिटले आहे, असे उत्तर पोलीस खाते आणि कंपनी प्रशासनाकडून देण्यात येऊ लागले.
एरव्ही गुन्हे नोंद करण्यात तत्पर असणारे पोलीस या प्रकरणात ढिले का पडले, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. यात मृत व्यक्तींच्या वारसांना काही रक्कम दिल्याचे बोलले जात आहे. परंतु पैशाने अशा गोष्टींवर पांघरूण घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पैसे देऊन प्रकरण मिटविता येते, असा संदेश समाजात जाईल आणि मग अराजकता माजेल यात तिळमात्र शंका नाही.
पोलीस खातेदेखील या मृत नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत नसून भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसत आहे. यात पोलीस खात्याचे हात ओले झाले असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात सुरू आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अजून शवविश्चेदन अहवाल अजून आला नाही, असे ढोबळ उत्तर पोलीस खाते देत आहे. (वार्ताहर)
कंपनीने चोरीचा मुरूम घेतलाच कसा?
याशिवाय या घटनेत दुसरी बाब अशी समोर येते आहे की, ज्या मुरुमाच्या दाबाने ही भिंत पडली तो मुरूम चोरी करून कंपनीत आणला गेला होता का? या मुरुमाची शासकीय दरबारी कुठल्याही प्रकारची शासकीय किंमत भरली नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कंपनीत भरावासाठी आणला गेलेला मुरूम कोणी आणि कोठून आणला? त्याची रॉयल्टी भरली आहे काय? भरली नसेल तर महसूल विभाग डोळे झाकून का बघत आहे? कंपनीने चोरीचा मुरूम घेतलाच कसा? असे अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहत आहे.