भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:16+5:302021-01-10T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “भंडारा येथील दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. त्याची सर्व चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “भंडारा येथील दुर्घटना अतिशय वेदनादायी आहे. त्याची सर्व चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी असतील त्यांना सोडणार नाही. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सर्व माहिती घ्यायला सांगितले आहे,” असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी पवार शनिवारी (ता. ९) पुण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले की, कोणत्याही रुग्णालयात २४ तास कोणाची ना कोणाची तरी ड्यूटी असतेच. प्रत्येक रुग्णालयाला सर्व प्रकारचे ऑडिट करावे लागते. या प्रकरणात काय झाले त्याची माहिती घेण्यात येत आहे. यात दगावलेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
भाजपाच्या कार्यकाळात हॉस्पिटलचे काम झाले असल्याच्या टीकेकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, “कोणाच्या कार्यकाळात काम झाले या गोष्टी आत्ता गौण आहेत. त्यात सरकारला काहीही रस नाही. अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रत्येकच रुग्णालयाचे ऑडिट करण्यात येईल. विरोधक अनेक आरोप करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष न करता त्यातील तथ्य तपासून पाहिले जाईल. तपासात सत्य काय आहे ते समोर येईल. दोषी कोणीही असले तरी सोडणार नाही.”
कोरोना टाळेबंदीनंतर आम्ही आता आमच्या अखत्यारीतील निर्णय घेत आहोत. शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यातलाच आहे. केंद्र सरकारने आता लोकल सुरू करायची किंवा नाही तो निर्णय घ्यावा, तो त्यांचा अधिकार आहे. शाळांची फी काहीच्या काहीच असते हे बरोबर आहे, ती कमी करावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच शिक्षण विभागाने समिती केली आहे. फी वाढवायची असेल तर पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असा नियम केला आहे. तरीही यात काही प्रकार होत असल्याच्या तक्रारी असून त्यात शिक्षण विभाग लक्ष घालेल असे पवार म्हणाले.
चौकट
महेश कोठेंची माहिती नाही
“पक्षप्रवेशांबाबत एकत्र बसून निर्णय घ्यायचा असे महाविकास आघाडीत ठरले आहे. पूर्वी आम्ही दोनच पक्ष होतो, आता तिघे आहेत, त्यामुळे कोणी कोणाला घ्यायचे, त्यामुळे कोणाचे नुकसान होईल याबाबत एकत्र बसून चर्चा होईल. सोलापूरचे महेश कोठे कुठे आहेत, मला माहिती नाही. त्यांच्याबरोबर माझे काहीही बोलणे झालेले नाही,” असे पवार यांनी सांगितले.
चौकट
अजित पवार ‘सरकार’...तेच बोलतील
“राज्य सरकार आहे इथे, तेच बोलतील यावर,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधण्यास नकार दिला. हे सांगताना थोड्या दूरवर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवण्यास ते विसरले नाहीत. ‘व्हीएसआय’मधील सभेनंतर पत्रकारांनी पवार यांना गाठले. आमदार रोहित पवार त्यांच्या समवेत होते. पत्रकारांनी शरद पवार यांना बोलण्याची विनंती केली असता त्यांनी दूर उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे बोट केले. आमदार रोहित यांच्याबरोबर त्यांनी बातचीत केली आणि लगेचच ते गाडीत बसून निघूनही गेले. नंतर रोहित हे अजित पवारांना जाऊन भेटले.