बौद्ध विद्येतील योगदानाबद्दल ‘भांडारकर’चा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:33+5:302021-05-30T04:09:33+5:30
केंद्र शासनाने स्थापन केलेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन या संस्थेतर्फे दरवर्षी बौद्ध विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बुद्ध ...
केंद्र शासनाने स्थापन केलेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन या संस्थेतर्फे दरवर्षी बौद्ध विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बुद्ध पौर्णिमेला समारंभपूर्वक वैशाख सन्मान पुरस्काराने गौरविले जाते. सन २०१५ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. यंदा २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या २०१९, २०२० आणि २०२१ च्या पुरस्कारांचे ऑनलाइन प्रदान करण्यात आले.
सन २०१९ चा पुरस्कार भांडारकर संस्थेस मिळाला. सन २०२० व २०२१ या दोन वर्षांचे पुरस्कार भारतासह भूतान, थायलंड, व्हिएतनाम आणि इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय विद्वानांना प्राप्त झाले. भांडारकर संस्थेचे माजी मानद सचिव आणि संस्कृत व बौद्ध विद्येचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ही माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले की, सध्या विविध विषयांवर ऑनलाइन अभ्यासक्रम ‘भांडारकर’तर्फे घेण्यात येतात. लवकरच श्रमण संस्कृतीपासून जैन, बौद्ध संस्कृतीपर्यंत विविध प्रकारचे ऑनलाइन अभ्यासक्रमांचे नियोजन केल्याचेही संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.
भांडारकर संस्थेने स्थापनेपासूनच प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात काम केले आहे. महाभारताची चिकित्सक आवृत्ती सुमारे ५० वर्षांच्या अथक परिश्रमाने अनेक विद्वानांच्या सहकार्याने भांडारकर संस्थेने तयार केली. संस्थेची संस्कृत, पाली, प्राकृत, वेद, व्याकरण, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या विषयाबाबतची अनेक प्रकाशने नावाजलेली आहेत. स्थापनेपासूनच संस्थेकडे पाली, चिनी, तिबेटी, थाय, श्रीलंका, म्यानमार अशा विविध देशांतील वेगवेगळ्या भाषांमधील बौद्ध धर्मातील धर्मग्रंथ (त्रिपीटके) संग्रही असून इतरही अमूल्य ग्रंथसंग्रह भांडारकर संस्थेकडे असल्याचे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी सांगितेले.
चौकट
पुरस्कार कशासाठी?
बौद्ध विद्येचा पाया भारतामध्ये रचणारे प्रा. धर्मानंद कोसंबी यांचाही संस्थेशी स्थापनेपासून जवळचा संबंध असून त्यांचाही संग्रह संस्थेकडे आहे. प्रा. पु. वि. बापट, प्रा. वा. वि. गोखले, प्रा. रं. दा. वाडेकर, प्रा. प. ल. वैद्य अशा अनेक जगन्मान्य विद्वानांनी आपल्या संशोधनाने बौद्ध विद्येच्या कार्यात योगदान दिले आहे. अनेक विदेशी विद्वानांनी बौद्ध विद्येचा अभ्यास भांडारकर संस्थेत या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली केला. भविष्यातही या क्षेत्रातील उपक्रम राबविण्याचा संस्थेचा विचार आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने भांडारकर संस्थेस हा पुरस्कार प्रदान केला आहे. पुरस्कारासाठी कोणताही अर्ज केला गेला नव्हता.