Pune: भानोबाचं चांगभलं! कोयाळीत भाविकांनी अनुभवला देव-दानव युद्धाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:51 PM2023-12-14T15:51:52+5:302023-12-14T15:52:31+5:30
श्री क्षेत्र कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव - दानव युद्धाचा असा थरार अनुभवला...
- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव (पुणे) : ढोल-ताशांचा गजर... भानोबा देवाचे मंदिराबाहेर आगमन... त्याक्षणी दानवांची युद्धाला सुरुवात... देवाच्या नजरेला नजर... आणि क्षणार्धात दानव मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळले... भानोबा देवाचा दानवांना स्पर्श होतो... देवाचा गजर... आणि दानवांना संजीवनी मिळते.
श्री क्षेत्र कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव - दानव युद्धाचा असा थरार अनुभवला. श्री भानोबा देवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी शिवभक्त श्री भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी भानोबानं तस्करांना दिला होता. त्यामुळे भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युध्द करावे लागत असल्याची आख्यायिका आहे.
श्री भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. गुरुवारी व शुक्रवारी देव - दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध स्वतः नयनांनी पाहण्यासाठी तसेच देवाच्या दर्शनासाठी दोन दिवसात हजारो भाविकांनी कोयाळीत हजेरी लावली. तत्पर्वी, आज पहाटे श्री भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडेअकरा ते एक यावेळेत देव - दानव युद्ध झाले. दोन दिवसात सुमारे दीड हजारांहून अधिक जणांनी युद्धात सहभाग घेतला. भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबरीतून सुरुवात झाली. सायंकाळच्या सत्रात वजननिहाय कुस्त्या पार पडल्या.
शनिवारी (दि. १५) सकाळी ६:०० ते ७:०० श्री भानोबा देवाचा ओलांडा व देवाचे राहुटी मंदिरातून जन्मस्थ मंदिरात आगमन, त्यानंतर दुपारी ३:०० ते सायंकाळी ७:०० श्री भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यानंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. तीन दिवसीय उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलिस ठाण्याअंतर्गत सुमारे शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलही तैनात करण्यात आले होते.
भानोबा देव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरूपी दानवने आपल्या हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. मात्र, देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर पडले. दरम्यान, त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना संजीवनी दिली.