भारत बंदला इंदापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:09 AM2020-12-09T04:09:27+5:302020-12-09T04:09:27+5:30
इंदापूर : केंद्र सरकारच्या कृषी विधयक बिलाच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात विविध संघटनांनी भारत बंदच्या ...
इंदापूर : केंद्र सरकारच्या कृषी विधयक बिलाच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात विविध संघटनांनी भारत बंदच्या दिलेल्या हाकेला इंदापूरकरांनी उदंड प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवले.
मंगळवार ( दि. ८ ) रोजी इंदापूर शहरात मुख्य बाजार पेठ, चाळीस फुटी रोड, इंदापूर नगरपरिषद व्यापारी संकुल तसेच सर्व भागातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तर भाजी मंडईत दररोज दिसणारी शेतकऱ्यांची गर्दी बंदमुळे पाहायला मिळाली नाही. इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता, त्यामध्ये बारामती येथील क्विक रिस्पॉन्स फोर्सचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक संघटनांनी तहसिल प्रशासनाला निवेदने देवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारने शेतकरी हिताचे कृषी विधायक बिल करावे अशी मागणी केली.
तर सकाळच्या प्रहरा पासून सर्व दुकाने बंद होते. मात्र सायंकाळी अनेक अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांनी आपल्या दुकानांची अर्धे दरवाजे उघडे ठेवून नागरिकांची सोय केली.
चौकट : इंदापूर तालुक्यातील बाजार समित्यांमध्येही शुकशुकाट
देशात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती, वालचंदनगर, भिगवण उप बाजार समित्यांमध्ये दिवसभर एकही शेतकरी आणि व्यापारी फिरकले नाहीत. त्याच बरोबर दररोज सकाळी भरणाऱ्या मासळी बाजार ही दिवसभर बंद होता.
-
वैभव दोशी
सचिव, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, इंदापूर
______________________________________
फोटो ओळ : इंदापूर मुख्य बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला होता