मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:42 PM2021-07-26T19:42:58+5:302021-07-26T19:45:15+5:30

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे.

Bharat Biotech's vaccines trial in Pune from September; work in the final stages at manjri | मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

Next

पुणे : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची रंगीत तालीम सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुण्यातील मांजरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेक या कंपनीचे काम अंतिम टप्यात आले असून, प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या देशात अपेक्षित प्रमाणात कोरोना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने नवीन निर्मितीकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. कागदोपत्री परवानग्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लस निर्मितीसाठी लागणारे वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले. 

देशमुख यांनी सांगितले, कंपनी व्यवस्थापनाबाबत प्रशासकीय पातळीवरील अन्न व औषध प्रशासन (एफडीए), महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ (एमएसीबी), प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि इतर विभागांकडून ना-हरकत परवानग्या देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीला यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन जाणून घेत तांत्रिक दुरुस्त्यांची कामे सुरू आहेत. कंपनीच्या हैदराबाद येथील मुख्यालयातून तज्ज्ञांचे पथक पाहणीसाठी आले होते. त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत. दरम्यान, किरकोळ तांत्रिक व्यवस्थापन होईपर्यंत शास्त्रज्ञांची भरती करण्यात येत आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर पासून प्रत्यक्ष लस निर्मिती प्रक्रिया सुरू होईल. रंगीत तालीम झाल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक, किरकोळ दुरुस्त्या तत्काळ दूर करून कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनाची लसनिर्मिती सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bharat Biotech's vaccines trial in Pune from September; work in the final stages at manjri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.