भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द
By Admin | Published: August 27, 2015 04:54 AM2015-08-27T04:54:41+5:302015-08-27T04:54:41+5:30
कोंढवा येथील प्रभाग क्रमांक ६३ अ मधून इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांनी निवडणूक लढविताना दिलेले जात प्रमाणपत्र अवैध आढळून
पुणे : कोंढवा येथील प्रभाग क्रमांक ६३ अ मधून इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांनी निवडणूक लढविताना दिलेले जात प्रमाणपत्र अवैध आढळून आल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची सभागृहातील संख्या १६ वरून १५ इतकी झाली आहे.
महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये इतर मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून भरत चौधरी निवडून आले. त्या वेळी त्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहंमद खान यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौधरी यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करून ते अवैध असल्याचा निर्णय दिला. लेखी पत्र मिळाल्यानंतर कुणाल कुमार यांनी निवडणूक अधिनियमातील तरतुदींना अनुसरून चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करीत असल्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे भरत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी दबावाखाली येऊन निर्णय घेतल्याचा आरोप चौधरी यांनी केला.