Bharat Gaurav Railway: भारत गौरवची तिसरी रेल्वे मुंबईतून २३ तारखेला सुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 05:04 PM2023-05-20T17:04:38+5:302023-05-20T17:06:44+5:30
मुंबईहून ही रेल्वे सुटल्यानंतर पुण्याहून प्रवासी घेऊन पुढे रवाना होणार आहे....
पुणे : रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी तिसरी भारत गौरव रेल्वे येत्या 23 मे रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार आहे. तर २ जून रोजी पुन्हा ती मुंबईला येणार आहे. या रेल्वेला आयआरसीटीसीकडून ‘श्री रामेश्वरम-तिरुपती : दक्षिण यात्रा’ असे नाव देण्यात आले असून, ही रेल्वे मुंबई-मैसूरु-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरूअनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती-मुंबई अशी धावणार आहे. मुंबईहून ही रेल्वे सुटल्यानंतर पुण्याहून प्रवासी घेऊन पुढे रवाना होणार आहे.
भारत गौरव यात्रेची पहिली रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून २८ एप्रिल रोजी सुटली होती. ही रेल्वे ‘पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा’ या नावाने धावली. त्यानंतर दुसरी रेल्वे ११ मे रोजी पुण्यातून सुटली. ही गाडी ‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात आली होती. आता ही तिसरी रेल्वे मुंबईतून दक्षिणेकडे जाणार आहे. ७५० प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत.
‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..
- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार
- सोबतीला गाइड असणार
- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था
- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय
- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही