शंभरीनंतरही भारत सेवक समाज अजून कार्यरत : गोपाळ कृष्ण गोखलेंची स्मृती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:39 PM2019-05-09T13:39:30+5:302019-05-09T13:46:20+5:30
अर्थशास्त्रावरील ज्यांच्या भाषणांची त्या काळात इंग्लडमधील खासदारही प्रतिक्षा करत असत त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५३ जयंती आज आहे.
राजू इनामदार
पुणे: अवघ्या पन्नास वर्षांचे आयुष्य, मात्र तेवढ्या कालावधीत त्यांनी देशातच नाही तर देशाबाहेरही लौकिक मिळवला. भारत सेवक समाज सारखी संस्था स्थापन केली. अर्थशास्त्रावरील ज्यांच्या भाषणांची त्या काळात इंग्लडमधील खासदारही प्रतिक्षा करत असत त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५३ जयंती गुरूवारी आहे. त्यांनीच सन १९०५ मध्ये स्थापन केलेल्या भारत सेवक समाज संस्थेच्या देशभरातील सर्व शाखा अजूनही उत्तर प्रकारे सक्रिय असून तिथे गोखले यांची जयंती साजरी होत आहे.
अठराव्या वर्षी बी. ए., २० व्या वर्षी प्रोफेसर, २१ व्या वर्षी पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस, २४ व्या वर्षी सभेच्या त्रैमासिकाचे संपादक, २९ व्या वर्षी काँग्रेसचे चिटणीस, ३४ व्या वर्षी प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य, ३६ व्या वर्षी वरिष्ठ कायदे मंडळाचे सदस्य, ३८ व्या वर्षी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ४० व्या वर्षी भारत सेवक समाज संस्थेची स्थापना. अशी लखलखती कारकिर्द असलेल्या गोखले यांची पुणे ही कर्मभूमी. पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनामिक्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे उचित स्मारक झाले आहे. मात्र, त्यापेक्षाही गोखले यांनी १२ जून १९०५ रोजी स्थापन केलेल्या भारत सेवक समाज अजूनही अविरत कार्यरत आहे हे वैशिष्ट्यपुर्ण आहे.
फक्त पुण्यात किंवा राज्यातच नाही तर तमीळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, ओरिसा, उत्तराचंल, कर्नाटक अशा अनेक राज्यात भारत सेवक समाज कार्यरत आहे. देशाच्या सेवेसाठी म्हणून संस्थेचे आजीवन सदस्य घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत व्हायचे असा उद्देश ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली. आज ११४ वर्षानंतरही ही संस्था व तिच्या सर्व शाखा उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. त्या गोखले यांच्या दुरदृष्टीमुळेच! गोखले अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून उत्तर आयुष्यात प्रसिद्धीला आले. अर्थशास्त्रावर त्यांनी केलेली भाषणे देशात, परदेशात गाजली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी भारत सेवक समाजाने शाळा, महाविद्यालये तसेच अर्थशास्त्राचा अभ्यास देशहिताच्या दृष्टिने करणाºया संस्था स्थापन केल्या.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्येच आज देशभरातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी पदव्यूत्तर अर्थशास्त्राचे संशोधन करत आहेत. भारत सेवक समाजाचे दहा जणांचे कार्यकारी मंडळ आहे. ओरिसा येथील साहू संस्थेचे अध्यक्ष आहेत. मिलिंद देशमूख चिटणीस आहेत. सर्वसाधारण सदस्यांची संख्या बरीच असून ते देशभरात विखूरलेले आहेत. त्यांची सर्वसाधारण सभा व दहा जणांच्या कार्यकारी मंडळाची आढावा तसेच नियोजन बैठक दरवर्षी जूनमध्ये होत असते. संस्थेच्या देशभरातील ५०० कर्मचाºयांच्या वेतनासाठी केंद्र सरकारचे अनुदान आहे. देखभाल दुरूस्तीचा खर्च मात्र संस्थेला करावा लागतो. संस्थेकडे असलेल्या ठेवींच्या व्याजावरून तो केला जातो.
गोखले यांनी त्यांच्या हयातीतच संस्था आर्थिक दृष्ट्या सुस्थिर करून दिली. त्यासाठी संस्थेच्या नावावर अनेक जागा खरेदी केल्या. त्यासाठीचा खर्च स्वत: केला. देशात, परदेशात असे त्यांचे सतत भ्रमण चालत असे. अखेरची काही वर्षे ते भारत सेवक समाजाच्या आवारात वास्तव्यास होते. तिथे त्यांचे निवासस्थान राज्य सरकारने दिलेल्या २५ लाख रूपयांच्या अनुदानातून जतन करण्यात आले आहे. तिथेच त्यांच्या छायाचित्रांचे एक चांगले संग्रहालय केले जात आहे.