वर्षभरापासून फरारी आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:57 PM2018-01-11T15:57:34+5:302018-01-11T16:00:11+5:30
जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले.
पुणे : जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले.
अक्षय ऊर्फ आकाश किशोर चौधरी (वय२१, रा़ मंतरवाडी, उरुळी देवाची, ता़ हवेली) याला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे़
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कात्रज चौकात आले असताना पोलीस कर्मचारी बाबा नरळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की कात्रज जुना बोगदा मस्तान हॉटेलजवळ मांगडेवाडी येथे दोघे जण मोटारसायकल घेऊन उभे असून त्यांच्याकडील मोटारसायकल संशयित आहे़ या माहितीवरुन पोलिसांनी दोन पथके तयार करुन तेथे सापळा रचला़ अचानक त्यांच्यावर छापा घालून पकडले़ त्यांच्याकडून मोटारसायकल व मोबाईल असा ३५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला़ अक्षय चौधरी याच्याकडील मोटारसायकल चोरीची असून त्याची शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, कृष्णा बढे, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबा नरके, योगेश सुळ, सुमित मोघे यांनी ही कामगिरी केली़