खासदार संजय सिंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे 'भारतीय झगडा पार्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 10:30 AM2022-08-01T10:30:39+5:302022-08-01T10:35:01+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल दोन राज्यांमध्ये भांडणे लावणारी वक्तव्ये करतात....
धनकवडी (पुणे) : गुजरातमध्ये भाजपचे लोक विषारी दारूचे गुत्ते चालवतात. मेघालयामध्ये हेच लोक वेश्यालये चालवतात. सात्त्विकतेचा आव आणणारे महाराष्ट्राचे राज्यपाल दोन राज्यांमध्ये भांडणे लावणारी वक्तव्ये करतात. भाजपचे लोक रोजगार, महागाई यांसारखे देशासमोरील मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून हिंदू-मुस्लिम समाजात भांडणे लावण्याचे काम करतात. ‘भारतीय जनता पार्टी’ म्हणजे ‘भारतीय झगडा पार्टी’ असून त्यांना सत्तेतून खाली खेचले पाहिजे, अशी टीका करत आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी पुण्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्यावतीने पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात महाराष्ट्र युवा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरलेल्या सभागृहात ‘आप’ खासदार संजय सिंग यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणावर जोरदार घणाघात केला.
यावेळी राज्य संघटक विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, राज्य समिती सदस्य जगजीत सिंग, देवेंद्र वानखेडे, संदीप देसाई उपस्थित होते.
यावेळी आपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते रंगा राचुरे म्हणाले, मंडईतील टाेमॅटो-बटाट्याप्रमाणे महाराष्ट्रात आमदारांची खरेदी-विक्री झाली. आमदार ५० कोटीला विकले गेले. शेतकऱ्यांसाठी असलेली पंतप्रधान विमा योजना आज ‘पंतप्रधान मान्यताप्राप्त मटका’ योजना झाली आहे. लाखो लोकांनी आज रस्त्यावर उतरून सरकारला या प्रश्नी जाब विचारला पाहिजे.
यावेळी दिल्ली विधानसभेतील आमदार कुलदीप कुमार, प्रभारी दीपक सिंगला यांनीही आपली भूमिका मांडली. संजय सिंग यांच्या भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. ‘जो सरकार निकम्मी है, आे सरकार बदलनी है!’ यासारख्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. महेश स्वामी यांनी आभार मानले.