भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केला १७ किलो अफू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:17+5:302021-01-16T04:14:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आलिशान मोटारीमधून तस्करी केला जाणारा १७ किलो २०० ग्रॅम अफू भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आलिशान मोटारीमधून तस्करी केला जाणारा १७ किलो २०० ग्रॅम अफू भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे पकडला गेला. याप्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिपाल गणपत बिष्णोई (वय ३०, रा. साई हाईट्स, हरपळे वस्ती, फुरसुंगी, मूळ रा. राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकामध्ये वाहतूक विभागाचे कर्मचारी वणवे आणि मांढरे वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी संशय आल्याने एक होंडा सिटी मोटार पोलिसांनी थांबविली. तपासणीदरम्यान, गाडीच्या डिकीमध्ये अफू असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर, पोलीस निरीक्षक अर्जून बोत्रे, उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पोत्यामध्ये भरलेली अफुची बोंडे (दोडा चुरा) जप्त केली आहेत. आरोपीने अफू कोठून आणला, कोठे घेऊन चालला होता, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा सविस्तर तपास केला जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.