भास्कराचार्यांनी गणिताची केली ‘कविता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:57+5:302021-03-14T04:11:57+5:30
पुणे : “गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. फलज्योतिषऐवजी गणितज्योतिष्यावर त्यांनी भर दिला. ग्रहणाबद्दलची भीती ...
पुणे : “गणितासारखा रुक्ष विषय भास्कराचार्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. फलज्योतिषऐवजी गणितज्योतिष्यावर त्यांनी भर दिला. ग्रहणाबद्दलची भीती घालवली. गणित मनोरंजकरीत्या मांडले. गणिताची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली हे योगदान अभूतपूर्व आहे,” असे प्रतिपादन गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी केले.
‘अंकनाद’तर्फे आयोजित थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ या ग्रंथावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. प्राची साठे यांनी वेबिनारमध्ये प्रास्ताविक केले. मंदार नामजोशी, पराग गाडगीळ, निर्मिती नामजोशी, समीर बापट आदी यात सहभागी झाले होते.
डॉ. आगरकर म्हणाले की परदेशात ब्राझीलपासून अनेक ठिकाणी भास्कराचार्याच्या गणित सूत्राचा उल्लेख होतो. देशात देखील हा अभ्यास व्हायला हवा. ‘भास्कर प्रथम’ हे सातव्या शतकात होऊन गेले. ‘त्रिकोणमिती’मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाने भारताने उपग्रह सोडला आहे. तर भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले. गणित आणि खगोलशास्त्रात त्यांनी योगदान दिले. त्यांच्याही नावे उपग्रह सोडण्यात आला.
वयाच्या ३६ व्या वर्षी भास्कराचार्य यांनी ‘सिद्धांत शिरोमणी’ ग्रंथ लिहिला. गणितासारखा रुक्ष विषय त्यांनी संस्कृत कवितेच्या रूपात मांडला. भास्कराचार्य यांच्यानंतर भारतीय गणिताची अधोगती झाली. पुढे जगात भास्कराचार्यांच्या लिखाणावर संशोधन सुरु झाले. जळगावच्या पाटण येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणिताची ‘भास्कर नगरी’ उभारण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती डॉ आगरकर यांनी दिली.