आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातलागवड संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:57 PM2019-07-23T13:57:20+5:302019-07-23T14:01:31+5:30
पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते.
तळेघर : गेले दहा ते बारा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने दडी मारल्यामुळे भातरोपांच्या लागवडी रखडल्या असून, आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यातला परिसर भातशेतीचे आगार समजला जातो. येथील आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यांतून भात एकमेव पीक काढतो. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवांनी ह्या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या कात्र्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत तर काही ठिकाणी चिडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. वरुणराजाने पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु पुनर्वसू (कोर) थोरल्या नक्षत्रांच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडीयोग्य होताच आदिवासी शेतकºयांनी भातरोपांच्या लागवडी सुरू केल्या. परंतु गेले दहा ते बारा दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भातलागवडी रखडल्या असून आदिवासी बांधव चिंंताग्रस्त झाला आहे. भातरोपे लागवडीसाठी लागणारा चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे काही शेतकरी विहिरी बंधाऱ्यांतून इंजिनाद्वारे पाणी घेऊन भातलागवडी करत आहेत. परंतु लागवड केलेल्या भातरोपांचे काय, असे प्रश्न्नचिन्ह आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. परंतु गेले कित्येक वर्षांपासून या भागामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात आहे. वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ जात आहेत.