भाटघर, डिंभे धरण झाले रिकामे
By Admin | Published: May 3, 2017 02:06 AM2017-05-03T02:06:37+5:302017-05-03T02:06:37+5:30
ब्रिटिशकालीन भाटघर धरणात केवळ ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असून, त्यातही निम्मा गाळच आहे. पावसाळा
भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरणात केवळ ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असून, त्यातही निम्मा गाळच आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून दीड महिना बाकी असून, धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १५ ते २० नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने सदरच्या योजना धोक्यात आल्या आहेत. अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे. त्यामुळे टँकरची मागणी करूनही दोन महिने होऊनही एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही. अशीच परिस्थती कायम राहिल्यास भविष्यात मोठ्याप्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
मागील वर्षी १०० टक्के भरलेल्या आणि २४ टीएमसी पाणीसाठा असलेल्या भाटघर धरणातून
मागील पाच महिने डिसेंबरपासून धरणातील पाणी खाली सोडल्याने सध्या धरणात फक्त ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणात अनेक वर्षे माती साचल्याने निम्मा गाळच आहे. त्यामुळे भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, सुतारवाडी, कुरुंजी, करंदी बु, कांबरे खुर्द, कांबरे बुदुक वाढाणे, वाकांबे, गोरड म्हसीवली, आस्कवडी जोगवडी हर्णस, लव्हेरी, माजगाव, पांगारी, वेळवंड या धरणाच्या पात्रातील नळपाणीपुरवठा योजनांच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या काठावर तातपुरत्या स्वरूपात काढलेले ढवरेही आटल्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
भाटघर धरणात ७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने धरणातील पाणीसाठा दर पावसाळ्यात सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत पसरत असलेला पाणीसाठा आता २० किलोमीटरपर्यंत खाली येऊन पाण्याचा खांडवा सुतारवाडीपर्यंत आला आहे. त्यामुळे सुतारवाडी व मळे महादेववाडी येथे धरणात ढवरा काढून त्यात मोटर टाकून पाणी घेतले होते. मात्र, धरणातील पाणी कमी झाल्याने दोन्ही ठिकाणचे ढवरे कोरडे पडले आहेत, तर कुरुंजी येथील धनगरवस्तीतील शिवकालीन विहिरीचे पाणी आटल्याने पाणीटंचाई सुरू झाली आहे. गावाला धरणातून ४५०० फूट पाइपलाइन करून पाणी कुरुंजी येथील शिवकालीन टाकीत सोडले आहे, तर कुरुंजी आश्रम शाळेच्या विहिरीला पाणी कमी पडत असून भुतोंडे येथील विहिरीला व खिळदेववाडी येथील शिवकालीन विहिरीला पाणी कमी पडत असल्यामुळे भोर पंचायत समितीकडे टँकरची मागणी दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे.
मात्र, अद्याप टँकर सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे
पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल सुरू असल्याचे भगवान कंक यांनी सांगितले. (वार्ताहर)
धरणातील पाणी खाली गेल्याने धरणाच्या काठावर असलेल्या जवळजवळ सर्वच विहिरींना पाणी कमी पडत असल्याने मोटर धरणातील डोहात टाकून तेथून नवीन पाइपलाइनने सदरचे पाणी विहिरीत सोडून पुन्हा विहिरीतील पाणी मोटारीने गावातील टाकीत सोडावे लागत आहे. यामुळे दररोज पाणी जसजसे खाली जाईल तसतशी मोटर खाली घेऊन जावी लागत आहे.
यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, तर धरणातील पाणी कमी झाल्याने धरणाच्या काठापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर धरणात जनावरांना पाणी पाजण्यास घेऊन जावे लागत आहे. अनेकदा जनावरे गाळात रूतून बसत असल्याचे कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले.
भाटघर धरणग्रस्तांनी आपल्या पिकाऊ जमीन धरणाला दिल्या. मात्र, येथील स्थानिकांच्या शेतीला सोडा, पण लोकांना पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. दरवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडतो. सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा असणारे धरण दर पावसाळ्यात १०० टक्के भरते आणि पुन्हा उन्हाळयात रिकामी होते. याच पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. मात्र, वीज तर सोडा पाण्याचा थेंबही मिळत नाही. येथील लोकांना पाण्याकडे बघण्या शिवाय कोणताच पर्याय राहात नाही. स्थानिकांना पिण्यासाठी लागेल इतकाही पाणीसाठा शिल्लक ठेवला जात नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
डिंभे धरणात केवळ १६ टक्केच साठा
डिंभे : डिंभे धरणात सध्या केवळ १६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. साडेतेरा टीएमसी पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. दिवसेंदिवस धरण पाणलोटक्षत्रात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून पाणी झपाट्याने कमी झाले आहे. आदिवासी गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या तालुक्यातील गावे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यंदा सिंचनासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डिंभे धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातून खरीप व रब्बीसाठी सलग दोन आवर्तने झाल्याने या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. सध्या या धरणातून पिण्यासाठीचे आवर्तन सुरू आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही होत आहे. सिंचनाबरोबरोच बाष्पीभवनाच्या माध्यमातून धरणातील पाणी झपाट्याने कमी झाल्याने पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)