भाटघरमधून विसर्ग वाढविला
By admin | Published: November 26, 2015 01:01 AM2015-11-26T01:01:40+5:302015-11-26T01:01:40+5:30
आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले
भोर : आधीच १० ते १५ दिवस लवकर पाणी सोडले. सोमवारी १,३५० क्युसेक्सने होणारा विसर्ग मंगळवारी अचानक २,५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यंदा तालुक्याला लवकर टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात बिघाड झाल्याने धरणाच्या इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून पाणी सोडले आहे. पूर्वेकडील भागाला सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सदरचे पाणी सोडल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी ७० टक्केच पाणीसाठा आहे. पुरंधर तालुक्यातील वीर धरणात ४० टक्केच पाणीसाठा असून, तेथून डाव्या व उजव्या कालव्यातून १२ दिवसांपासून पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यामुळे वीर धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी नीरादेवघर धरणातून ७५० क्युसेक्सने पाणी खाली सोडले होते. मात्र, धरणग्रस्तांनी सदरचे पाणी बंद केले. मग सोमवारी भाटघर धरणातून सुरुवातीला १३५० क्युसेक्सने व मंगळवारी २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडण्यात येत आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडण्याचे ठरले होते. मात्र, वीजनिर्मिती केंद्रात बिघाड असल्याचे कारण सांगत इरिगेशन गेटमधील तीन मोऱ्यांतून २५९९ क्युसेक्सने पाणी नीरानदीत सोडले आहे. ६०० क्युसेक्स पाणी जादा सोडण्यात येत आहे. जादा पाणी सोडण्याच्या हेतून फक्त पावसाळ्यात वापरले जाणारे गेट उघडून पाणी सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)