गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:32 PM2020-03-21T14:32:34+5:302020-03-21T14:33:29+5:30
मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी
भोर : मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर येथील विद्युत मंडळाच्या महापारेषण व वितरण कंपनीच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी शिरल्यामुळे यावर्षी वीजनिर्मिती केंद्र मागील आठ महिने बंद आहे. यामुळे आतापर्यंत ४० मिलियन युनिटचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान झाले आहे आणि कदाचित यात वाढ होऊ शकते. वीजनिर्मिती केंद्रात अशा प्रकारचे नुकसान पहिल्यांदाच झाले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पाच ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात पाणी जाऊन मागील आठ महिन्यांपासून वीजनिर्मिती केंद्र बंद असून मागील चार वर्षांत वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच घटना असून त्यामुळे आतापर्यंत सरासरी ४० मिलीयन युनिटच्या विजेचे आणि सुमारे ११ कोटींचे नुकसान झाले असून त्यात वाढही होऊ शकते. मात्र हे सर्व अंदाज वीज केंद्राच्या दुरुस्तीच्या कामानंतरच नुकसानीचा अंदाज येणार असल्याचे भाटघर वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास देशपांडे व भाटघर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील वाल्हेकर यांनी सांगितले.
सध्या भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू असून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.मे अखेर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ आॅगस्टला भाटघर धरण पूर्ण भरल्यावर पाणी येथील वीजनिर्मिती केंद्राच्या पहिल्या दोन मजल्यांवर शिरल्यामुळे रोहित्र पॅनल जळाले. जनरेटर पाण्यात गेले, त्यामुळे भोर शहरासह सुमारे ६० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर भोरच्या अग्निशमन बंबाने व वीज वितरण महापारेषण कंपनी एक आठवडाभर वीज केंद्रातील पाणी बाहेर काढत होते. यावेळी सलग तीन-चार दिवस आमदार संग्राम थोपटे घटनास्थळी राहून वीजनिर्मिती कंपनीला मदतकार्य करून कामकाजाची माहिती घेत होते.
........
पर्यायी व्यवस्था : ६० गावांचा वीजपुरवठा होणार पूर्ववत
वीज वितरण कंपनीच्या वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था करून शहरासह ग्रामीण भागातील ६० गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला. यातून निर्माण झालेली वीज १३२ केव्ही कामथडी आणि शिरवळ केंद्राला पुरवली जाते. साधारणपणे धरणातील पाणी दरवर्षी आॅक्टोबर ते मेअखेरपर्यंत दुष्काळी भागातील पिकांसाठी व पिण्यासाठी सोडले जाते. त्या कालावधीत वीजनिर्मिती केली जाते.
...........
* पावसाच्या पाण्यामुळे वीजनिर्मिती कें द्रातील जनरेटर, तळाचे टर्बाईन, बॅटरी, कॉम्पॅक्टर, आॅईल, वायरिंग यासारखे पूरक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनरेटर बाहेर काढायला एक महिना लागला असून जनरेटर, हिटिंग, ड्राइंगचे काम सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
* काम पूर्ण झाल्यावरच झालेले नुकसान व खर्च याची महिती कळू शकणार आहे. दरवर्षी ४० मिलियन युनिटची वीजनिर्मिती केली जाते. मागील वर्षी ५४ मिलीयन युनिट वीजनिर्मिती झाली होती आणि यावर्षी अधिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
* पावसामुळे सर्वच अंदाज फेल ठरले असून वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे अवघड काम पारेषण व वितरण कंपनीवर येऊन पडले आहे.